भिवंडी शहरासह नदीनाका परिसरातील शेकडो घरात शिरले पाणी

भिवंडी शहरासह नदीनाका परिसरातील शेकडो घरात शिरले पाणी

भिवंडीमध्ये घरात शिरले पाणी

भिवंडी शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु असून दिवसभर बरसलेल्या पावसाने भिवंडी शहरासोबतच तालुक्यातील असंख्य गावांना झोडपून काढले आहे. महानगरपालिका सीमेवरील कामवारी नदीचे पाणी वाढल्याने नजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नदीनाका परिसरातील रफिक कंपाऊंड येथील शेकडो घरांमध्ये सुमारे चार ते पाच फुट पाणी शिरले आहे. यामुळे येथील नागरीक हवालदिल असून ग्रामपंचायत व तहसीलदार प्रशासनाने त्यांना कोणतीही आपत्कालीन मदत न दिल्याने त्यांना पाणी असलेल्या घरात जीव मुठीत धरुन पलंगावर रात्र काढण्याची वेळ आली आहे. परंतू बारा तासानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील नालेसफाई ही वरवरची झाली असून गटारांमधील गाळ काढला न गेल्याने हे पाणी गटारा बाहेरून वाहत असल्याने या परिस्थितीला सर्वस्वी मनपा प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने भिवंडी शहरातील असंख्य सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. मंडई, तिनबत्ती भाजी मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, कमला हॉटेल, कामतघर, बाला कंपाऊंड, ईदगाह येथे मोठ्या प्रमाणावर दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

भिवंडी महानगरपालिका सिमेवरुन वाहणारे कामवारी नदी लगत शेलार ग्रामपंचायत असून या नदी किनारी नदीनाका या परीसरात दिवसभर पडलेल्या पावसाने येथील शेकडो घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरवात झाली. पाहता पाहता चार ते पाच फुट पाणी येथील घरांमध्ये शिरल्याने येथील कुटुंबीय त्यांना इतरत्र कोणतेही पर्यायी निवास व्यवस्था नसल्याने त्याही अवस्थेत आपल्या घरात साचलेल्या पाण्यात अन्न, साहित्य भिजून गेल्याने उपाशीपोटी पलंगावर मदतीच्या अपेक्षेत बसून राहीले होते. परंतू सकाळी बारावाजेपर्यंत त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी ना ग्रामपंचायत प्रशासन मदतीला धावून आली ना तहसीलदार कार्यालय, हे दुर्दैव. यामुळे येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर घरात काही अन्न न शिजवल्याने नाईलाजास्तव महिलांनी हातगाड्यांवर स्वंयपाक बनवण्यास चूल मांडली होती. विशेष म्हणजे या परीसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असताना तेथील विद्युत पुरवठा सुरु असल्याने तेथे विद्युत पुरवठा पाण्यात उतरल्यास शॉक लागून काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्या नशिबी आलेले जीवन या अधिकाऱ्यांच्या वाट्याला आल्यास त्यांना या दुःखाची खरी जाणीव होईल.
– अर्जुन गुप्ता, रहिवासी

हेही वाचा –

‘बॅटमॅन’ आमदाराला जामीन; भाजप कार्यकर्त्यांचा गोळीबार करत जल्लोष

कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण; विपुल आणि विवेक अग्रवालला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

First Published on: June 30, 2019 6:07 PM
Exit mobile version