‘नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या शेकडो घटना घडतील’

‘नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या शेकडो घटना घडतील’

भाजपाचे आमदार राज पुरोहित

‘मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ होईल. तसेच निर्भयासारख्या शेकडो घटना घडतील’, असे मत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. जर मद्यपानाची ही संस्कृती प्रसिद्ध पावली तर मुंबईत महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ देखील होईल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ही संस्कृती भारतासाठी योग्य आहे का? याचा विचार करावा’, असे मत राज पुरोहित यांनी व्यक्त केले आहे.

विरोधकांचा तीव्र आक्षेप!

शिवसेनेचे युवराज आणि राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या नाईट लाईफविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत २४ तास हॉटेल, मॉल सुरू राहू शकतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यानंतर विरोधकांनी त्या निर्णयाला तीव्र विरोध केला. ‘राज्य सरकार जर निवासी भागातील हाँटेल, पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल’, असं भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं होते. तर महाविकास आघाडीकडून या निर्णयाचे समर्थन केले जात आहे.

मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही

या निर्णयानुसार रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. २४ तास हॉटेल्स आणि मॉल्स सुरु ठेवण्यासाठी सेवांचे नियमन, अटी तयार करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. वरळीतील अ‍ॅट्रिया मॅाल, घाटकोपरमधील आरसीटी मॅाल, गोरेगावमधील ऑबेरॉय मॉल, फिनिक्स आदी २५ मॅाल्समध्ये नाईटलाईफसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील अनेक दुकाने, रेस्टॅारन्ट आदी आस्थापने २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. दरम्यान, नाईट लाईफला परवानगी देण्यात आली असली तरी मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही.


हेही वाचा – VIDEO – शिवरायांच्या चेहऱ्यावर मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर शहा


 

First Published on: January 21, 2020 12:21 PM
Exit mobile version