प्लास्टिक बंदीचा परिणाम; पार्सल घेणे महागणार

प्लास्टिक बंदीचा परिणाम; पार्सल घेणे महागणार

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने या प्रकारचे नवे प्लास्टिक कंटेनर आणले आहेत.

हॉटेलमधून पार्सल मागायचा विचार करत असाल तर आता जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवा. मग इडली सांबार मागवा किंवा बिर्याणी, तुमच्या प्रत्येक पार्सलसाठी किमान १० ते १५ रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने ग्राहकांना पार्सलसाठी देण्यात येणार्‍या प्लास्टिक कंटेनरसाठी जादा पैसे आकारण्याचे ठरवले आहे. संघटनेच्या ८ हजार सदस्यांमार्फत ही जादा दर आकारणी केली जाणार आहे.

हॉटेलमधून तुम्ही काय ऑर्डर करणार यावर सगळ्या पार्सलसाठीचे अतिरिक्त पैसे आकारले जातील. जर तुम्ही इडली ऑर्डर केली तर त्यासोबत सांबार, चटणी, चमचा, इडली या प्रत्येक गोष्टीला प्लास्टिक कंटेनर लागेल. त्यालाही १० रूपये ते १५ रूपये आकारण्यात येईल. जितका कंटेनर मोठा तितके जादा दराने पार्सलसाठी पैसे आकारण्याचे असोसिएशनने सुचविले आहे. पण हे कंटेनर रिसायकलेबल आणि रियुजेबल असल्याने ग्राहकांना हे हॉटेलला पुन्हा देता येतील. कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंटला हे कंटेनर स्वीकारले जातील, अशी माहिती आहाराचे जनरल सेक्रेटरी विश्वपाल शेट्टी यांनी दिली. ग्राहकांकडून हे कंटेनर स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

याआधी हॉटेल व्यावसायिक पार्सलच्या कंटेनरचा खर्च स्वतः करत होते. पण राज्य सरकारला अपेक्षित पर्यावरणपूरक अशा प्लास्टिकसाठी होणारा खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. प्लास्टिकबंदीचा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना ३० टक्क्यांनी अधिक बसला आहे. गेल्या आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांना झालेल्या कारवाईबाबत मुंबई महापालिका अधिकारी वर्गाला भेटणार आहोत असेही, शेट्टी यांनी सांगितले.

 

अशी असेल दरआकारणी

३०० मिली      – ४.२५ रूपये
२०० मिली      – ३.५० रूपये
१०० मिली       – २.३६ रूपये
चमचा           – २ रूपये
ब्राउन पेपर बॅग – १.८०

First Published on: June 27, 2018 6:01 PM
Exit mobile version