…तर ‘त्या’ सोसायट्यांना १०-२० हजार रुपयांचा दंड

…तर ‘त्या’ सोसायट्यांना १०-२० हजार रुपयांचा दंड

सध्या झोपडपट्टीत कोरोना रुग्णांची संख्या कमी असून सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होताना निदर्शनास आले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार ज्या सोसायटीमध्ये कोरोनाचे ५ रुग्ण आढळतील ती सोसायटी सील करण्यात येणार असून त्या सोसायटीला ‘मिनी कंटेन्मेंट’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

सदर, सोसायटीमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी कोरोनाबाधित रुग्णांबाबतची माहिती दर्शवणारे फलक दर्शनीय ठिकाणी लावण्यात येणार आहे. तसेच, अशा सोसायटीत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे.

कोरोनाला नियंत्रित करण्याची जबाबदारी सोसायट्यांवर टाकण्यात आली आहे. सोसायटीमधील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असणार आहे. जर कंटेन्मेंट झोनमधील सोसायटीत कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित सोसायटीला १० हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याच सोसायटीने पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्या सोसायटीला २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

प्रत्येक सीलबंद सोसायटी, इमारतीच्या प्रवेशद्वारात पोलीस कर्मचारी ठेवण्यात येणार आहे, असे सदर परिपत्रकात म्हटले आहे.

तसेच, मुंबईत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केल्याने बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.

तसेच, किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

ई- कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

सोसायटीमध्ये फेरीवाले, वृत्तपत्रे, पार्सल घरी पोहोचविणार्‍यांना मनाई करण्यात आली आहे. ज्या सोसायटीला वृत्तपत्रे हवीत, अन्नपदार्थ हवेत त्यांनी सोसायटीच्या गेटवर येऊन ते घेऊन जावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, कोरोनाबाधित व्यक्तीला होम क्वारंटाईन असताना स्वतःच्या फ्लॅटच्या बाहेर येण्यास अथवा सोसायटीबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. जर असा व्यक्ती, रुग्ण फ्लॅटच्या अथवा सोसायटीच्या बाहेर आढळून आल्यास त्याचा फ्लॅट सील करण्यात येणार असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

मुंबईत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.

First Published on: April 7, 2021 6:20 AM
Exit mobile version