राजकीय, संवेदनशील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी नको

राजकीय, संवेदनशील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी नको

राज्यात अनेक ठिकाणी राजकीय व संवेदनशील कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय व संवेदनशील कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येऊ नये अशा सूचना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भातील शाळास्तरावरील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील दयानंद विद्यालयात सीएए समर्थनासाठी विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड लिहून घेण्यात आली. त्यामुळे किमान शाळांना राजकारणापासून दूर ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा राजकीय विचार पसरवण्यासाठी वापर होता कामा नये, अशा शब्दांत शिक्षणमंत्र्यांनी शाळांना निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी काढलेल्या नोटीसमध्ये ही बाब शालेय शिस्त बिघडवणारी तसेच विद्यार्थ्यांच्या बालमनावर चुकीचे संस्कार व शैक्षणिक प्रगतीला बाधा आणणारी असल्याचे नमूद केले. त्यामुळे राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रम शाळेच्या आवारात घेऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करू नये असे स्पष्ट निर्देश राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषदा तसेच खासगी शाळांना बजावण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापक हे अनेकदा कोणत्यातरी पक्षाशी बांधील असतात. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना मुकाटपणे काम करावे लागते व कारवाईचे बळी पडावे लागते. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून काढलेल्या या परिपत्रकामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. खरा इतिहास, धर्म व संस्कृति याची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हेच शिक्षकांचे कर्तव्य असून नव्या सरकारकडून थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त नवीन ध्येय धोरणे अपेक्षित आहेत.
– उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल

First Published on: January 15, 2020 5:31 AM
Exit mobile version