मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बेजबाबदार अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बेजबाबदार अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नालेसफाई पाहणी दौऱ्याप्रसंगी सांताक्रूझ मिलन सब वे येथील नाल्यात कचरा व गाळ आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पालिकेच्या पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शुक्रवारी सांताक्रूझ येथील मिलन सब वे, अंधेरी (पूर्व) येथील गोखले ब्रिज, जोगेश्वरी येथील ओशिवरा नदी, पोयसर नदी, दहिसर नदी, आनंद नगर नाला येथे भेट देऊन नालेसफाई कामांची पाहणी केली.
याप्रसंगी, मुंबई उपनगर भागाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे,खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम, आमदार सुनील राणे, माजी मंत्री व आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, पालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक अमेय घोले, अभिजित सामंत, विनोद शेलार, प्रवीण दरेकर पालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी, गुरुवारपासूनच नालेसफाई कामांची पाहणी सुरू केली. शुक्रवारी त्यांनी पुन्हा सांताक्रूझ, मिलन सब वे येथील भूमिगत पाणी साठवण टाकीच्या कामांची व मिलन सब वे येथील नाल्याची पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी, नालेसफाईचे काम चांगले झाल्यास व मुंबईत पाणी न साचल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल व जर नालेसफाई करूनही त्यात कामचुकारपणा झाल्यास आणि त्यामुळे मुंबईत पाणी तुंबल्यास संबंधित अधिकाऱ्याला नारळ देण्यात येईल, असे बजावले होते. त्यानुसार, आज मिलन सब वे येथील नाल्यात नाल्यात गाळ व कचरा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना आढळून आले. नाला स्वच्छ नसल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 नागरिकांनी तक्रारी करावी
ज्या ज्या भागात नालेसफाईची कामे झालेली नसतील असे आढळून येईल तेथील नागरिकांनी पालिकेकडे एका विशिष्ट क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलें. तसेच, सदर तक्रार आल्यावर त्यावर पालिकेकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यंदा पावसाळ्यात पाणी साचणार नाही
यंदा नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी साचणार नाही, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

गोखले पुलाचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण होईल
गोखले पुलाचे काम येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत एकबाजू पूर्ण होईल. त्यासाठी आवश्यक विशिष्ट प्रकारचे स्टील उपलब्ध करण्याबाबत मी स्वतः जिंदाल यांच्याशी फोनवर थेट बोलणे केले आहे. तसेच, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलणे केले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

 

First Published on: May 19, 2023 10:53 PM
Exit mobile version