मोदींनी आचारसंहितेचा भंग केला – जयंत पाटील

मोदींनी आचारसंहितेचा भंग केला – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

‘डीआरडीओचे वैज्ञानिक यापूर्वी ज्या मोहिम करत त्याच्या घोषणा तेच करत होते. परंतु, यावेळी पंतप्रधानांनी सॅटेलाईट पाडल्याची घोषणा केली. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे आणि तो पंतप्रधानांनी केला आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर लोकसभेसाठी आग्रह होता. राष्ट्रवादी काँग्रेसही त्या जागेसाठी आग्रही होती. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला असून जळगावमधील दोन जागांपैकी रावेरची जागा काँग्रेस लढवेल तर जळगावची जागा राष्ट्रवादी लढेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मोदींची परराष्ट्र निती फसली’

जयंतराव पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र निती फसली आहे. पंतप्रधान मोदी यामध्ये अपयशी ठरले आहेत. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात मोदी कमी का ठरले? चीनचा पाठिंबा का मिळवता आला नाही? नेपाळ, श्रीलंका भूतान या सर्व देशांशी चांगली परिस्थिती नाही. मग मोदींनी पाच वर्षात काय केले? फक्त बोलायचे, करायचे काहीच नाही हे भाजपचे धोरणच. या धोरणामुळेच लोक नाराज आहेत. समाजातील प्रत्येक घटक या सरकारवर नाखुश आहे.’

‘राम मंदिर बाजूला भाजपचे कार्यालय टोलेजंग’

महाआघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाआघाडीचे सरकार आले पाहिजे अशी भावना लोकांच्या मनात आहे. अर्ज भरण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत आहे. महाआघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले. यापुढे ते म्हणाले की, ‘भाजप मतदारांना पैशांची आमिष दाखवत असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहे. नोटाबंदीने सर्व पक्ष आणि भाजपमध्ये काय फरक पडला आहे हे दिसत आहे. राम मंदिर बाजूला राहिले मात्र भाजपचे कार्यालय टोलेजंग बांधले गेले.’

First Published on: March 29, 2019 3:37 PM
Exit mobile version