#JNU Attack : गेट वे ऑफ इंडियावरचं आंदोलन पोलिसांनी थांबवलं!

#JNU Attack : गेट वे ऑफ इंडियावरचं आंदोलन पोलिसांनी थांबवलं!

रविवारी रात्री दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर काही अज्ञात जमावाने हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. अनेक ठिकाणी तरूण-तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करताना दिसत होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ देखील मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले होते. दिल्लीत ही घटना घडली, तेव्हापासून हे आंदोलक तिथेच ठाण मांडून बसले होते. त्याचप्रमाणे आंदोलकांची संख्या देखील वाढू लागली होते. मात्र, या परिसरामध्ये आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे मुंबई पोलीस आंदोलकांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी विनंती करत होते. पण आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी आंदोलकांना सक्तीने या ठिकाणहून हलवून आझाद मैदान येथे स्थलांतरीत केलं आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंदोलकांना हलवण्यात आलं. दरम्यान, आझाद मैदानावर गेल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवत असल्याचं जाहीर केलं आहे. ‘४० तास आम्ही आंदोलन केलं असून त्याला मिळालेला पाठिंबा पाहाता आंदोलन यशस्वी झाल्याचं आम्हाला वाटतंय’, अशी प्रतिक्रिया एक आंदोलक विद्यार्थी कपिल अगरवाल याने दिली आहे.

मुंबई पोलिसांची संवेदनशीलता!

दरम्यान, आज सकाळी ७ वाजताच मुंबई पोलीस आंदोलन स्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांच्याकडून सक्तीने आंदोलन चिरडलं जातंय की काय, असं चित्र सुरुवातीला निर्माण झालं. आधी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातून आझाद मैदानात जाण्यास विनंती केली. पण आंदोलक तिथून हलण्यास तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी सक्तीने आंदोलकांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. तेव्हा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा किंवा अटक केल्याचा समज झाला. मात्र, ‘आंदोलकांना अटकही केलेली नाही किंवा ताब्यात देखील घेतलेलं नाही. त्यांना फक्त इथून आझाद मैदानमध्ये स्थलांतरीत केलं आहे’, असं नंतर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं.

का हलवलं आंदोलकांना?

याविषयी मुंबई पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, ‘गेट वे ऑफ इंडिया या परिसरात आंदोलनाला परवानगी नाही. न्यायालयाने देखील तशा स्वरुपाचे आदेश दिलेले आहेत. आंदोलक सुरुवातीला आले, तेव्हा त्यांनी एकच दिवस आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. मात्र, या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं. शिवाय, आझाद मैदान येथे आंदोलकांना मोठी जागा देखील उपलब्ध आहे आणि इतर सोयी देखील तिथे उपलब्ध आहेत. म्हणून आंदोलकांना आझाद मैदान येथे हलवण्यात आलं आहे. तसेच, आंदोलनाची रीतसर परवानगी देखील घेण्यात आलेली नव्हती.’


Video – ‘गोळ्या खाऊ पण मोदी-शहापासून आझादी मिळवू’
First Published on: January 7, 2020 7:45 AM
Exit mobile version