पालिकेच्या मृत कामगारांच्या वारसांना नोकरीचे नियुक्तपत्र

पालिकेच्या मृत कामगारांच्या वारसांना नोकरीचे नियुक्तपत्र

बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले होते. या तुंबलेल्या पाण्यात काम करणार्‍या महापालिकेच्या पी/दक्षिण विभागातील दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना अवघ्या चार दिवसांमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त अशोक खैरे, पी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी तातडीने कार्यवाही करत या दोन्ही कामगारांच्या नातेवाईकांना नोकरीचे नियुक्त पत्र देताना, विमा योजनेंतर्गत एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला. महापालिकेच्या इतिहासात कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना अवघ्या चार दिवसांमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याची ही पहिलीच घटना आहे.

मागील बुधवारी, ४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या मुसळधार पावसात महापालिकेचे ३२ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. तेव्हा ‘पी दक्षिण’ विभागातील कामगार जगदीश परमार (५४) हेे कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी (४०)हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडले. त्यांना इतर कर्मचार्‍यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्वरित ’हिंदुरहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सर्वोपचार रुग्णालयात’ नेले. परंतु तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दोन्ही कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले होते. त्यानुसार शनिवारी दिनांक ७ सप्टेंबर २०१९ रोजी मृत जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. तसेच रविवार सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. महापालिका प्रशासन कर्मचारी आणि त्यांचा कुटुंबाच्या सुख, दुःखात नेहमीच पाठीशी असल्याचे यावेळी अशोक खैरे यांनी सांगितले.

First Published on: September 9, 2019 5:35 AM
Exit mobile version