सिडकोच्या लॉटरीमध्ये विविध प्रवर्गांना न्याय द्या!

सिडकोच्या लॉटरीमध्ये विविध प्रवर्गांना न्याय द्या!

सिडकोने २ ऑक्टोबर २०१८ रोजी घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या पाच ठिकाणी १४ हजार ८३८ घरांसाठी लॉटरी काढली होती. यापैकी १ हजार १०० घरांना शून्य प्रतिसाद मिळाला. या घरांची पुन्हा लॉटरी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र, ही घरं केवळ सर्वसाधारण गटासाठी म्हणजेच जनरल पब्लिकसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय – संचालकांना पत्र पाठवून विविध प्रवर्गांसाठीदेखील या लॉटरीत घरे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

सिडकोच्या घरांसाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, अनुसूचित जाती – जमाती, भटके विमुक्त, पत्रकार, कलाकार, अंध आणि शारीरिक अपंग, माजी सैनिक, सुरक्षा दलातील व्यक्ती, माथाडी कामगार अशा विविध गटातील अनेक नागरिकांनी अर्ज केले होते. परंतु, घरांच्या लॉटरीमध्ये त्यांच्या पदरी निराशा आली आहे. आता १ हजार १०० घरांसाठी निघणार्‍या आगामी लॉटरीमध्ये या प्रवर्गांसाठी घरे राखीव ठेवण्यात आलेली नाहीत. याविरोधात सर्व स्तरातून संताप आणि विरोध व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रवर्गांतील नागरिकांवर अन्याय न करता त्यांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा उर्वरित घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे.

First Published on: January 3, 2019 5:25 AM
Exit mobile version