कर्नाटक काँग्रेसचे १० आमदार मुंबईतच; भाजप मंत्र्याचा दुजोरा!

कर्नाटक काँग्रेसचे १० आमदार मुंबईतच; भाजप मंत्र्याचा दुजोरा!

कर्नाटक नकाशा

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाही मागच्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा पेच अद्याप मिटलेला नाही. कर्नाटकमधली राजकीय सुंदोपसुंदी अजूनही सुरूच असून भाजपने काँग्रेस-जेडीएसचं सरकार खाली खेचायची जोरदार तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठीच कर्नाटक काँग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. त्याला आज मंगळवारी राज्याचे जलसंधारण मंत्री आणि भाजपचे प्रभावशाली नेते राम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. ‘कर्नाटकमधले काँग्रेसचे आमदार मुंबईत त्यांच्या स्वत:च्या इच्छेनेच आले आहेत’, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी ‘माय महानगर’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे भाजपकडून कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचंच यातून स्पष्ट होत आहे.

कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी होणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये कमळ फुलणार. वास्तविक तिथे आम्हाला बहुमत मिळाले होते. पण काँग्रेस-जेडीएसच्या अभद्र युतीमुळे आमचं सरकार आलं नाही. आणि मुंबईत आलेले कर्नाटक काँग्रेसचे आमदार हे स्वत:च्या मर्जीनेच आले आहेत.

राम शिंदे, आमदार, भाजप

कर्नाटकमधून या १० आमदारांना मुंबईत आणण्याची आणि इथे त्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी मुंबईतल्या भाजपच्या एका मोठ्या प्रभावशाली नेत्याकडे सोपवण्यात आल्याचं देखील वृत्त होतं. त्या वृत्ताला आता राम कदम यांच्या वक्तव्यामुळे दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये २ अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला आहे. मात्र, काँग्रेसचे सर्व आमदार आघाडीसोबतच असल्याचा दावा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये वास्तविक भाजपला सर्वाधिक (१०४) जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस(७८) आणि जेडीएस(३८) या दोन्ही पक्षांनी आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे या आघाडीकडे कर्नाटक विधासभेच्या एकूण २२४ जागांपैकी ११६ जागांसह बहुमत सिद्ध झालं होतं. त्या आधारावर झालेल्या बोलणीनुसार जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

First Published on: January 15, 2019 3:46 PM
Exit mobile version