स्मार्ट सिटीसाठी महापालिका सज्ज

स्मार्ट सिटीसाठी महापालिका सज्ज

kdmc

कल्याण-डोंबिवली शहराने स्मार्ट सिटीच्या दिशेन पाऊल उचलले असून त्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली. स्मार्ट सिटीत एरिआ बेस डेव्हलपमेंंटच्या माध्यमातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसराचा कायापालट होणार आहे. स्टेशन परिसर, एसटी बस डेपोचा विकास आणि एपीएमसी येथील मेट्रोचे स्टेशन एकमेकांशी जोडले जाणार आहे.

स्मार्ट सिटीसंदर्भात नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर सुमारे 41 टक्के लेाकांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीकोनातूनच रेल्वे स्थानक परिसराचा समावेश करण्यात आला आहे. बस स्टॅण्ड, ऑटो रिक्षा, केडीएमटी आणि इतर खासगी वाहने यांच्यासाठी वेगवेगळा मार्ग असणार आहे. तसेच स्कायवॉक मेट्रेा स्टेशनला कनेक्ट करण्यात येणार आहे, असेही बोडके यांनी सांगितले. तसेच कल्याण पूर्वेला सहा लाख लोक स्टेशनवर येत असतात. हे अंतर लांब असल्याने लोकांना पायपीट करावी लागते. सध्याचा लोकग्राम ब्रीज मोठा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागेत पार्किंग प्लाझा उभारणार आहे. कल्याण पूर्वेला रेल्वे सहा प्लॅटफार्म करण्याच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सध्या रेल्वे प्रशासनाबरोबर बोलणी सुरू असून त्यांचा उत्तर अजूनही आलेले नाही.

सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे कल्याण डोंबिवलीत उभारण्यात येणार आहे. नदी आणि खाडीकिनारा सुशोभीकरण जलवाहतूकही सुरू होण्यासाठी कल्याण डोंबिवलीत जेट्टी उभारण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत कल्याण भिवंडी ठाणे मेट्रो प्रकल्प, रिंगरूट प्रकल्प, सिटी पार्क, कल्याण स्टेशन परिसर विकास आदी प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे असेही बोडके यांनी सांगितले. कचर्‍याची समस्या महत्वाची आहे. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड येथे वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प आणि अमृतमध्ये ड्रेनेज सिस्टीमची कामे सुरू आहेत.

टाऊन प्लॅनिंग ड्रीम प्रोजेक्ट
वाडेघर आणि सापार्डे या दोन गावात 750 एकर जमीनीवर टाऊन प्लॅनिंग स्कीम प्रोजेक्ट साकारला जाणार आहे. महापालिकेचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चार महिन्यात शासनाची मान्यता मिळेल. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या 50 टक्के जमिनी घेतल्या जाणार आहेत. याठिकाणी रस्ते पाणी गार्डन कर्मशियल एरिआ डेव्हलप करणार आहे. सध्या पडीक जमिन असून एक सिटी डेव्हलप होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे नवीन शहर वसविण्याचा आराखडा पालिकेन तयार केला आहे. त्यासाठी कोरीअन कंपनीने पुढाकार घेतला आहे. आयटी पार्क सिटी पार्क मनोरंजन नगरी उद्याने बगीचे आदी नवीन सुविधा साकारल्या जाणार आहेत. तसेच कल्याण पश्चिमेत गौरीपाडा येथे सिटी पार्क साकारण्यात येणार आहे. सिटी पार्कसाठी 1 लाख 21 हजार 600 चौरस मीटर जागा आरक्षीत आहे. त्यापैकी 93 हजार 232 चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. 36 हजार 615 चौ जागा सीआरझेड मध्ये आहे. सिटी पार्कमध्ये 1700 झाडे लावली जाणार आहेत. त्यात 679 झाडे हिरवी 951 झाडे मोसमी व 70 पाम ट्री आहेत. लॅण्डस्केपिंग स्पोर्ट कॉम्पलेक्स लहान मुलांना खेळण्यासाठी जागा प्रदर्शन हॉल 750 क्षमतेचा रंगमंच बांबू थीम रेस्टॉरंट बॉटनिकल गार्डन सीसीटिव्ही कॅमेरे जनरेटर टेक्सटाईल फॅब्रिक अम्ब्रेला आदी सुविधा आहेत.

First Published on: June 27, 2019 4:46 AM
Exit mobile version