आरे कारशेडमध्ये ठाकरे सरकारचा घोटाळा – किरीट सोमय्या

आरे कारशेडमध्ये ठाकरे सरकारचा घोटाळा – किरीट सोमय्या

भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरे कारशेडमध्ये प्रकरणी ठाकरे सरकारने घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. काही मंत्री मुख्यमंत्र्याच्या प्रतिष्ठेसाठी आरे बाबतची सर्व प्रकरणे दाबली जात असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. सरकारमध्ये येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय पहिला घेतला. त्यानंतर एक समितीस्थापन करत अहवाल देखील मागितला. या समितीची मुदतही संपली आहे आणि आरे काॅलनीतच कारशेड करण्यात यावे अशी शिफारस केल्याची आमची माहिती आहे. पण तरीही या समितीच काही काम बाकी आहे असे म्हणत या समितीला मुदतवाढ देण्याच्या हालचाली मंत्रालयात सुरू असल्याची टीका सोमय्या यांनी यावेळी केली.

कोणत्या नियम, कायद्याच्या आधारे काम थांबवले?

एवढेच नाही तर दोन खासगी जागाधारकांना ४ हजार कोटी रुपयांचा फायदा व्हावा, यासाठी कमिटीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही सोमय्या यावेळी म्हणालेत. दरम्यान शिवसेना महाआघाडी सरकार सत्तेवर येऊन ३४ दिवस झाले असून, सरकारने आरे कारशेडला स्टे दिल्याचे म्हणत कारशेडमध्ये हे सरकार गोंधळ घालत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. आजपर्यंत आरे कारशेड स्थगितीमुळे २०० कोटींचे नुकसान झाले आहे ते कोण भरून काढणार?  कोणत्या नियम, कायद्याच्या आधारे काम थांबवले?, असा सवाल उपस्थित करत एमएमआरसीएलने कोणत्या आधारे काम थांबवले? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने बांधकाम थांबवा असे काही सांगितले नसल्याचे सांगत सरकार मुद्दाम यात घोटाळा करू पाहत आहे त्यामुळे स्थगिती देण्यात आल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मग दुसरी जागा निवडली का?

दरम्यान यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला आरे कारशेडची जागा नको असेल तर मग दुसरी कोणती जागा निवडली का? असा सवाल उपस्थित करत समिती जर आहे ती जागा योग्य आहे असे म्हणत असेल तर मग त्यांच्यावर दबाव आणला जातोय का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच समिती ११ डिसेंबरला स्थापन झाली आणि २६ डिसेंबरला अहवाल देणे अपेक्षित होते पण त्यावर एक आठवडा होऊनही हा अहवाल बाहेर आलेला नाही. याचा अर्थ बंगलेपे आके मीलो असा आहे का? असा सवाल देखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – ‘त्या’ दालनाकडे अखेर सर्वच मंत्र्यांनी फिरवली पाठ


 

First Published on: January 2, 2020 8:34 PM
Exit mobile version