घरताज्या घडामोडी'त्या' दालनाकडे अखेर सर्वच मंत्र्यांनी फिरवली पाठ

‘त्या’ दालनाकडे अखेर सर्वच मंत्र्यांनी फिरवली पाठ

Subscribe

मंत्र्यांना आज दालने वितरीत करण्यात आली मात्र ६०२ हे दालन कुणालाही देण्यात आले नाही.

महाविकास आघाडीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना आज दालने वितरीत करण्यात आली असून तसा शासनादेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला. मात्र या दालनाच्या यादीवर नजर टाकली असता ६०२ क्रमांकाचे दालन कुणालाही देण्यात आले नाही. त्यामुळे अजित दादांनी नकार दिलेल्या त्या दालनाकडे सर्वच मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना ६०२ दालनाचा ताबा मिळेल अशी चर्चा रंगली होती मात्र अजित पवार यांनी हे दालन घेण्यास नकार दिला. एवढे नाही तर त्याऐवजी अजित पवार यांनी सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कार्यालयावर कब्जा केला आहे आणि तेच दालन आता अजित दादांना वितरित करण्यात आले.

म्हणून नकोय मंत्र्यांना ‘ते’ दालन 

आत्तापर्यंत ६०२ क्रमांकाच्या दालनात ज्या-ज्या मंत्र्याने कारभार केला त्यांना राजकारणात प्रगती करता आली नसल्याची चर्चा आहे. १९९९ मध्ये राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. नियमानुसार ६०१ क्रमांकाच दालन मुख्यमंत्री तर ६०२ क्रमांकाच दालन उपमुख्यमंत्री यांना देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांनी त्या दालनाचा स्वीकार केला. कालांतराने भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. त्यानंतर हेच दालन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. अजितदादांनी याच दालनातून कारभार पाहिला. पण सिंचन घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. २०१४ मध्ये आघाडी सरकारचा पराभव करीत भाजपाने सत्ता काबीज केली. त्यावेळी ६०२ दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळाले. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु एमआयडीसी जमीन घोटाळ्यामुळे खडसे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर ६०२ दालन भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आले होते. फुंडकर हे तत्कालीन कृषीमंत्री होते. दुर्दैवाने फुंडकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी भाजपाचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री म्हणून वर्णी लावत त्यांनाही तेच दालन दिले. पण विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना घरी बसावे लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -