धक्कादायक: स्थलांतरीतांमुळे ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढतंय

धक्कादायक: स्थलांतरीतांमुळे ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढतंय

आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यात वर्षभरात ६७६ कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून आल्याच लेखी उत्तर आमदार रविंद्र फाटक यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सरकारने दिले आहे. ठाण्यासोबतच कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या शहरांमध्येही मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री (कुष्ठरोगासाठी कारणीभूत असणारा जंतू) या जंतूचा फैलाव होत असल्याचेही लेखी उत्तरात म्हटले आहे. तसेच सदर शहरांमध्ये स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून दाट लोकवस्तीमुळे कुष्ठरोगाचे रुग्ण आढळत असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

वर्षभरात आढळले ६७६ रूग्ण 

स्थलांतरीतांची दाट लोकवस्ती आणि संसर्ग झाल्यापासून प्रत्यक्ष रोगाची लक्षणे दिसण्यासाठी लागणारा मोठा कालावधी यामुळे देखील कुष्ठरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची लेखी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना देखील आरोग्य विभागाने हाती घेतल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयक आरोग्य शिक्षण दिले जात आहे. तसेच २०१६-१७ पासून दरवर्षी ठाणे जिल्ह्यात ‘कुष्ठरोग शोध मोहिम आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम’ राबविण्यात येत आहे. शिवाय नव्या कुष्ठरूग्णांच्या सहवासातील नागरिकांचीही तपासणी केली जात आहे. सहवासातील लोकांमध्ये कुष्ठरोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक औषधोपचार केले जात आहेत. तसेच जनसामान्यांपर्यंत कुष्ठरोगाबाबतची माहिती देऊन तपासणीसाठी रुग्नांणा स्वतःहून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.


हेही वाचा – विकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी; अनेकांना काम थांबविण्याच्या नोटीसा


 

First Published on: February 25, 2020 5:46 PM
Exit mobile version