तरुणीला फसवणार्‍या लव्हगुरुला अटक

तरुणीला फसवणार्‍या लव्हगुरुला अटक

अटक

ब्रेकअपनंतर प्रियकरासोबत पुन्हा प्रेम जुळवून आणण्याच्या नावाने एका तोतया लव्हगुरुने तरुणीला सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या लव्हगुरुला राजस्थान येथून वनराई पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

निखीलकुमार सुरेशकुमार भार्गव उर्फ निक्की उर्फ लव्हगुरुजी असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार तरुणी ही जोगेश्वरी परिसरात राहत असून एका आयटी कंपनीत कामाला आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केले होते. मात्र, ती त्याची मनधरणी करीत होती, तो तिचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याच दरम्यान तिने एका सोशल साईटवर लव्हगुरुची जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधून तिने घडलेला प्रकार सांगून त्याच्याकडे मदत मागितली होती.

यावेळी निखीलकुमार याने तिला तिच्या प्रियकरासोबत समझोता होईल, त्यांच्यातील प्रेम जुळवून आणण्यासाठी काही विधी आणि पूजा कराव्या लागतील असे सांगितले. त्यासाठी तीदेखील तयार झाली, निखीलकुमारने दिलेल्या बँक खात्यात तिने गेल्या काही दिवसांत पूजा आणि विधीसाठी 2 लाख 61 हजार रुपये जमा केले. नंतर निखीलकुमारने त्याचे फोन बंद केले होते. हा प्रकार या तरुणीकडून तिच्या पालकांना समजताच त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तोतया लव्हगुरुविरुद्ध तक्रार केली होती.

First Published on: January 29, 2020 2:42 AM
Exit mobile version