‘बिरबलाची खिचडी’ ची चूल मांडत विरोधकांनी केला सरकारचा निषेध

‘बिरबलाची खिचडी’ ची चूल मांडत विरोधकांनी केला सरकारचा निषेध

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर  सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज ‘बिरबलाची खिचडी’ ची चूल मांडत गॅस दरवाढ, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या मुद्द्यावरून सरकारचा निषेध केलाय. तसंच “बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट… फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट”, अशा घोषणांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला होता.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सोळावा दिवस असून आज देखील विरोधक विविध प्रश्नांवरुन आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने करत सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा जाहीर निषेध केला आहे. ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘पन्नास खोके, एकदम ओके’ …अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते.

 

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमकपणे आंदोलन करत असताना सत्ताधारीही आंदोलन करु लागले. मात्र ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधार्‍यांच्या आंदोलनाची हवाच निघून गेली. आपल्याला माध्यमात जागा मिळत नाहीय हे लक्षात येता कुरघोडी करत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या समोर येऊन सत्ताधारी आंदोलन करत माध्यमांचे लक्ष वेधून घेत होते. मात्र तरीही ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधाऱ्यांची गोची झाली. मात्र माध्यमांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनालाच जास्त महत्व दिल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: March 23, 2023 11:58 AM
Exit mobile version