उत्पन्नाचा दाखल सादर करण्यासाठी ‘या’ दोन योजनांसाठी राज्य सरकारने दिली सूट

उत्पन्नाचा दाखल सादर करण्यासाठी ‘या’ दोन योजनांसाठी राज्य सरकारने दिली सूट

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास मार्च-२०२१ पर्यंत सूट दिल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता असते. परंतु कोविड – १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यास मार्च २०२१ पर्यंत सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या निर्णयाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येतात. या प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचा नियम आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, रोगग्रस्त, वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होतो. अशा व्यक्तींना कोविड – १९ चा धोका अधिक आहे याचा विचार करून ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य विभागाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सन २०१९ – २० या आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखला मार्च – २०२१ पर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्यास सूट देणारे परिपत्रक जारी केले आहे.


 

First Published on: December 17, 2020 1:06 PM
Exit mobile version