‘ती’ आरोपी तरुणी अल्पवयीन

‘ती’ आरोपी तरुणी अल्पवयीन

माहीम हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेली आराध्या जितेंद्र पाटील ऊर्फ रिया बेनेट रिबेलो ही तरुणी अल्पवयीन असल्याचे तिच्या जन्मदाखल्यातून उघडकीस आले असून तिच्यावर आता बालन्यायालयात खटला चालणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान ही अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश लोकल कोर्टाने दिले आहेत.

2 डिसेंबरला माहीम समुद्रकिनार्‍याजवळील रशीद दरबा बंगल्याजवळ पोलिसांना एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. याप्रकरणी माहीम पोलिसांत हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास केला होता. त्यानंतर काही दिवसांत या हत्येचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. हा मृतदेह सांताक्रुज येथे राहणार्‍या बेनेट रिबेलो यांचा होता. बेनेट यांची आराध्या ही दत्तक मुलगी असून तिनेच तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने बेनेट यांची 26 नोव्हेंबरला त्यांच्या राहत्या घरी बांबू आणि चाकूने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी अलीमियाँ नावाच्या एका मित्राची मदत केली होती. पोलीस तपासात ही माहिती उघडकीस येताच या तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी आराध्या आणि अलीमियाँ हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे तर तिचा प्रियकर हा डोंगरी बालसुधारगृहात आहे.
भावाच्या शोधानंतर वयाचा उलगडा

पोलीस कोठडीत असताना आराध्याच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. सुरुवातीला तिने तिच्या पालकांची माहिती देण्यास नकार दिला होता. अखेर शनिवारी तिच्या एका भावाची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले. वृषभ ऊर्फ वैभव जितेंद्र पाटील ऊर्फ जोगळे असे या भावाचे नाव असून तो नवी मुंबईतील रबाळे रेल्वे स्थानकाजवळील जय मल्हार सोसायटी राहत असल्याचे समजले. या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पोलीस कोठडीत असलेली आराध्या ऊर्फ रिया ही त्याचीच बहिण असून तिचे खरे नाव भाविका जितेंद्र जोगळे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिचे वय 17 वर्ष 4 महिने 23 दिवस असल्याचे उघडकीस आले.

First Published on: December 16, 2019 2:23 AM
Exit mobile version