माहुलचे आपद्ग्रस्त बीपीसीएलच्या नजरकैदेत

माहुलचे आपद्ग्रस्त  बीपीसीएलच्या नजरकैदेत

माहुलमध्ये बुधवारी झालेल्या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना कोणीही भेटू नये, म्हणून बीपीसीएलच्या अधिकार्‍यांना या दुर्घटनाग्रस्त आणि त्यांच्या नातलगांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा सुरू आहे. सुश्रुत हॉस्पिटलमध्ये या दुर्घटनेतील ग्रस्तांना उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यापासून त्यांच्या नातलगांशी कोणी बोलू नये, प्रकल्पातील त्रुटी बाहेर येऊ नयेत, म्हणून अधिकार्‍यांनी या नातलगांना हॉस्पिटल परिसरातच घेरले आहे.

अधिकार्‍यांच्या या कृतीने माहुलमध्ये तीव्र संताप पसरला असून, या अधिकार्‍यांचा जोरदार निषेध केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या सुशील भोसले यांना पुढील उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी भोसलेंच्या बहिणीने केली आहे. प्रकल्पातील हायड्रोक्रॅकरच्या स्फोटात जखमी झाल्याने भोसले यांची प्रकृती चिंताजनक आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी करूनही सुश्रृत हॉस्पिटल दाद देत नसल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रकल्पातील त्रुटींमुळे हा अपघात घडल्याचे उघड झाले आहे.

ही बाब उघड होऊ नये, म्हणून जखमी उपचार घेत असलेल्या सुश्रुत हॉस्पिटल परिसरात बीपीसीएल अधिकार्‍यांचा डेरा पडला आहे. प्रकल्पातील त्रुटी बाहेर जाऊ नयेत, याकरता प्रकल्पाचे अधिकारी तत्पर झाले आहेत. उपचार घेत असलेल्या दुर्घटनाग्रस्तांना आणि त्यांच्या नातलगांना कोणी भेटू नये, म्हणून या अधिकार्‍यांनी हॉस्पिटलमध्येच त्यांना घेरले आहे. पत्रकारांनाही त्यांच्याशी अधिकारी बोलू देत नाहीत, असे निदर्शनात आले आहे. बीपीसीएल कंपनीने लादलेली ही नजरकैद असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) हायड्रो क्रॅकरचा बुधवारी दुपारी तीन वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटात 43 जण जखमी झाले असून, त्यातील पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमींतील 20 जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रात्री घरी सोडण्यात आले तर उर्वरित 22 जणांपैकी 10 जणांना गुरुवारी सकाळी घरी सोडण्यात आले. सध्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये 12 जणांवर उपचार सुरू असून, त्यातील पाच जणांवर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यातील सुशील भोसले यांच्या डोक्याला जबर मार बसला असून, नानादीप वालवे याच्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. या दोघांची प्रकृती गंभीर आहे.

सुशील भोसले यांच्या डोक्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. परंतु सुश्रुत हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन नसल्याने त्यांच्यावर उपचार होण्यात दिरंगाई होत आहे. भोसले यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी भोसले यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात यावे, अशी मागणी भोसले यांच्या बहिणीने हॉस्पिटलचे सीईओ डॉ. पॅट्रिक प्रताप यांच्याकडे केली. यावर प्रताप यांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्याकडे चांगले डॉक्टर असून, तिन्ही पाळ्यांमध्ये त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

जखमींची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये आलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मध्यस्थी केली. त्यांनी भोसले व वाळवे यांच्या कुटुंबियांना जर आपल्या व्यक्तीला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये न्यायचे असेल तर हॉस्पिटल प्रशासनाने त्याला परवानगी द्यावी, अशी सूचना सीईओ डॉ. पॅट्रिक प्रताप यांना केली. यामुळे प्रशासनाने भोसले यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे.

First Published on: August 10, 2018 5:00 AM
Exit mobile version