३० वर्षीय महिलेवर कुर्ल्यात सामूहिक बलात्कार

३० वर्षीय महिलेवर कुर्ल्यात सामूहिक बलात्कार

raped

थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री उशिरा एका ३० वर्षांच्या विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्यांपैकी दोन आरोपींना काही तासांतच पोलिसांनी अटक केली. मुख्तार शेख आणि शाहीद आरिफ अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील तिसरा आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

नक्की घडलं काय?

पीडित महिला ही तिच्या ५५ वर्षीय पतीसोबत राहते. ३१ डिसेंबरला रात्री अडीच वाजता ती तिच्या घराजवळील शौचालयात गेली होती. यावेळी तिथे असलेल्या तीन जणांच्या एका टोळीने तिला थांबविले. तिचे हात पकडून तसेच तोंड दाबून हे तिघे तिला बाजूलाच असलेल्या एका शेडमध्ये घेऊन गेले. तिथे या तिघांनीही तिला दारु आणि एमडी ड्रग्ज जबदस्तीने दिले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. दारुसह एमडी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे ती रात्रभर तिथेच बेशुद्ध होती. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला जाग आली असता तिला तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे समजले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तिन्ही आरोपींनी तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने ती तिच्या घरी आली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या तिच्या परिचित लोकांना सांगितला. या माहितीने त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. काही वेळाने ती कुर्ला पोलीस ठाण्यात आली आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

आरोपी पीडितेच्या ओळखीचे

सदर गुन्ह्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी लागलीच शोधमोहीम सुरु केली. ही शोधमोहीम सुरु असतानाच गुरुवारी मुख्तार शेख आणि शाहीद आरिफ या दोघांनाही पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली. त्यांचा एक सहकारी पळून गेला असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तिन्ही आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असून पीडित महिलेच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.


वाचा काय म्हणतंय सर्वोच्च न्यायालय – ‘लिव्ह इन’मधील शरीरसंबध बलात्कार नव्हे
First Published on: January 4, 2019 10:12 PM
Exit mobile version