महापौर ‘गुरुजी’ पालिका विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार!

महापौर ‘गुरुजी’ पालिका विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार!

महापौर विश्वनाथ महाडेश्वर शाळेत शिकवणार

एखादी राजकीय व्यक्ती विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे देणार आहे, अस जर तुम्हाला सांगितले तर… कदाचित तुम्ही म्हणाल काय तरीच काय राव…, असं कुठे असतं का, राजकारणी आणि विद्यार्थ्यांना शिकवणार…? असाच काहीसा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना? पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आता चक्क मुंबईतील पालिका शाळेतील विद्यार्थाना इंग्रजीच्या व्याकरणाचे धडे देणार आहेत. एकेकाळी शिक्षक असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांना विद्यार्थ्यांना शिकवायला फार आवडतं. आता ते आपली ही शिकवणी देण्याची आवड लवकरच पूर्ण करणार आहेत. लवकरच ते पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवणार असल्याची माहिती त्यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

३३ वर्षे होते शिक्षक

अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात एमएची पदवी संपादन केलेले विश्वनाथ महाडेश्वर हे पूर्वी शिक्षकपदी कार्यरत होते. ते राजकारणात येण्यापूर्वी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. घाटकोपरच्या पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या टेक्निकल शाळेत त्यांनी ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवला होता. त्यानंतर सांताक्रूझ येथील राजे संभाजी विद्यालय या स्वतःच्या शिक्षण संस्थेत २००२ ते २०१८ या काळात ते मुख्याध्यापकपदी कार्यरत होते.

विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवणार?

जशी गणित विषयाची अनेकांना भीती वाटते, तशीच इंग्रजी विषयाची देखील विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यातच भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळात एखादं वाक्य बनवणं म्हणजे पोटात गोळाच येतो. मात्र हे काळ कसे वापरायचे आणि तेही कमी वेळात याचे धडे महापौर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देणार आहेत. त्यामुळे मुंबईचे महापौर आता गुरुजींच्या वेशात दिसणार हे मात्र नक्की!

First Published on: July 11, 2018 7:06 PM
Exit mobile version