मेट्रो-5 म्हणजे भाजपाची शिवसेनेवर कुरघोडी

मेट्रो-5 म्हणजे भाजपाची शिवसेनेवर कुरघोडी

मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या मेट्रो पाच प्रकल्पाचे भूमिपूजन म्हणजे लोकांची दिशाभूल आहे. ज्या प्रकल्पाचे अद्याप टेंडरही निघालेले नाही, त्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. मेट्रो-पाच हा प्रकल्प फायद्यापेक्षा नुकसानदायकच असून केवळ लोकांनाच नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेला देखील या प्रकल्पाचा कोणताही फायदा नाही. एकच खासदार असलेल्या भिवंडीमध्ये भाजपाने हा प्रकल्प राबवल्याने राज्य सरकारने शिवसेनेवर कुरघोडी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आला. या प्रकल्पासंबंधी सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, ठामपा विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मेट्रो-5 प्रकल्प म्हणजे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी आहे. पण, ही बाब शिवसेनेच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. काल्हेर- भिवंडीची लोकसंख्या आणि कळवा, मुंब्रा-दिवा,डोंबिवली यांची लोकसंख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करुन हा प्रकल्प कापूरबावडीमार्गे कळवा-मुंब्रा-दिवा- डोंबिवली असा फिरवायला हवा होता. मध्य रेल्वेशी संलग्न ही मेट्रो रेल असती तर लाखो प्रवाशांना त्याचा फायदा झाला असता. मात्र, केवळ भाजपच्या खासदाराच्या क्षेत्रात मतांच्या राजकारणासाठी ही मेट्रो फिरवण्यात आली आहे. भिवंडीकरांनी कधीच मेट्रोची मागणी केलेली नाही. मेट्रोची खरी मागणी ही रेल्वे प्रवाशांची आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा, ठाकुर्ली, कोपर, डोंबिवली आदी भागातील नागरीकरण मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येथील रेल्वेप्रवाशांना मेट्रो रेल्वेची खरी गरज आहे. मात्र, केवळ राजकीय हेतूने हा मार्ग भिवंडीमध्ये वळवण्यात आला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

मेट्रो -4 ही वडाळा ते कासारवडवली अशी धावणार आहे. 32.32 किमीच्या या अंतरात 32 रेल्वे स्थानके आहेत. त्यापैकी कापूरबावडी या स्थानकातून मेट्रो-5 ला सुरुवात केली जाणार आहे. हा मार्ग काल्हेर कशेळीमार्गे धामणकर नाका ते कल्याण एपीएमसी मार्केट व्हाया दुर्गाडी किल्ला असा आहे. 24.9 किमीच्या अंतरात 17 स्थानकांचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यासाठी सुमारे 8 हजार 415.61 कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, हा मार्ग नुकसानीचाच आहे. आपण खासदार असल्यापासून या मार्गाला विरोध करीत आहोत. कारण, मध्य रेल्वेला जोडणारा हा मार्ग नसल्याने तो कोणत्याच पद्धतीने फायदेशीर नाही.

त्याऐवजी हा मार्ग कापूरबावडी- कळवा- मुंब्रा-दिवा, शिळ-27 गावे आणि डोंबिवली- कल्याण असा नेल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सन 2021 पासून म्हणजे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर दररोज 2.29 लाख प्रवासी मेट्रोचा लाभ घेतील, असे सांगण्यात येत असले तरी ही संख्या अत्यंत कमी आहे. गर्दीच्या वेळी ही संख्या केवळ 17 हजार 870 असणार आहे. त्या उलट जर हा मार्ग मध्य रेल्वेशी संलग्न केला असता तर ही प्रवाशी संख्या पाचपट वाढू शकते. त्यामुळे हा प्रकल्पच मुळात चुकीचा असल्याचे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

First Published on: December 18, 2018 4:46 AM
Exit mobile version