मेट्रो प्रकल्पामुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात – जयराम रमेश

मेट्रो प्रकल्पामुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात – जयराम रमेश

आरेमध्ये होऊ घातलेल्या कारशेला स्थानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून तीव्र विरोध होत असताना आता माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी देखील मेट्रोच्या आरेमधल्या कारशेडला विरोध केला आहे. ‘मेट्रोच्या कारशेडमुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर फक्त बोलून काही होणार नाही. त्याअनुषंगाने कृती होणं देखील गरजेचं आहे. विकासाला आमचा विरोध नसून होणारा विकास योग्य पद्धतीने आणि नियोजित असायला हवा. पर्यावरण आणि विकास यांच्यामध्ये संतुलन असायला हवे’, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही आरेच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली.

ठाकरे पिता-पुत्रांच्या भूमिकेचं स्वागत!

दरम्यान, यावेळी बोलताना जयराम रमेश यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आरेविषयी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. ‘पक्ष म्हणून नेहमीच आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढत आलो आहोत. मात्र, आरे आणि मेट्रो प्रकल्पाविषयी त्यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. ते दोघे प्रकल्पाच्या विरोधात बोलले हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे’, असं जयराम रमेश यावेळी म्हणाले.


हेही वाचा – नाणार आठवतेय ना,आरेचेही तेच होणार!-उद्धव ठाकरे

‘आरेच्या जागेवर अनेकांचा डोळा’

‘मुंबई शहराच्या आणि शहरातल्या वातावरणाच्या दृष्टीने आरेचं महत्त्व जास्त आहे. पण आरेच्या जागेवर आज अनेकांचा डोळा आहे. इथे प्रकल्प आणला तर इथे अजून लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे आरेच्या जंगलामध्ये कारशेड आणून तिथे घुसखोरी करण्याचाच हा डाव आहे’, असा आरोप रमेश यांनी केला. ‘प्रकल्पाच्या नावाखाली चालवलेला विकास हा खरंतर दबावतंत्राचा भाग आहे. यातून पर्यावरणाचा ऱ्हासच होणार आहे. देशाचे पंतप्रधान पर्यावरणाच्या मुद्द्यावर नेहमीच वकिली करत असतात. पण भाजपमधल्याच अनेकांनी आम्हाला सांगितलं की पर्यावरणावरची आमची भूमिका योग्य आहे, फक्त सरकारच्या विरोधी आम्ही काही बोलू शकत नाही’, असं देखील रमेश यावेळी म्हणाले.

First Published on: September 17, 2019 4:42 PM
Exit mobile version