मुंबईत चाललंय काय? तो फक्त हसला, म्हणून दोघांनी मारून टाकलं!

मुंबईत चाललंय काय? तो फक्त हसला, म्हणून दोघांनी मारून टाकलं!

प्रातिनिधिक छायाचित्र

हसण्यावरुन झालेल्या वादातून सोळा आणि सतरा वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांनी धीरज गुलाबराव गुसाई नावाच्या एका अठरा वर्षांच्या तरुणाची लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मालाड परिसरात घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही डोंगरी बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी सांगितले. इतक्या क्षुल्लक वादातून अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाथाबुक्क्यांनी केली हत्या!

धीरज हा त्याच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील संतोषनगर परिसरात राहत होता. दोन्ही आरोपी मुले याच परिसरातील रहिवाशी असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी १२ एप्रिलला धीरज हा दुकानातून दूध आणण्यासाठी जात होता. सायंकाळी पावणेपाच वाजता तो मालाड येथील रिद्धी-सिद्धी गार्डनजवळील नवज्योतसिंग इमारतीसमोरुन जात होता. यावेळी तिथे दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलं उभी होती. त्यातील एकाला पाहून धीरज हसला. याच कारणावरून या दोघांनी त्याला जाब विचारला. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि या दोघांनी त्याला लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत धीरज बेशुद्ध पडला. ही माहिती स्थानिक रहिवाशांना समजताच त्यांनी त्याला जवळच्या लाईफलाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे धीरजला मृत घोषित करण्यात आले.


हेही वाचा – चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

आरोपींची रवानगी बालसुधारगृहात

रुग्णालयातून ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्यासह कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी धीरजसोबत असलेल्या तरुणाची पोलिसांनी जबानी नोंदवून दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यात नंतर पळून गेलेल्या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना शनिवारी डोंगरीतील बालन्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांना डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. धीरज आणि या दोन्ही मुलांमध्ये पूर्वीही क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता, असे तपासात उघडकीस आले आहे.

First Published on: April 15, 2019 9:39 PM
Exit mobile version