आता वसई, पेण, पनवेल, अलिबागपर्यंत एमएमआरडीएची हद्द

आता वसई, पेण, पनवेल, अलिबागपर्यंत एमएमआरडीएची हद्द

एमएमआरडीए

मुंबई विकास प्राधिकरणाच्या हद्दीच्या विस्ताराला आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वच आमदारांनी पाठींबा दर्शवला. त्यामुळे वसई, पेण, पनवेल आणि अलिबाग या विभागाला एमएमआरडीएच्या या हद्द विस्ताराचा फायदा होणार आहे. एमएमआरडीकडून या विभागातील विविध प्रकल्पांना निधी पुरविण्यात येणार असल्याने येथील प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एमएमआरडीएची हद्द वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वच आमदारांनी या निर्णयाला पाठींबा दिला. आता मुंबई विकास प्राधिकरणाचा फायदा हा वसई, पेण, पनवेल आणि अलिबाग या विभागाला होणार असल्याचे मत नवनिर्वाचीत नगरविकास मंत्री योगेश सागर यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळणार चालना

या हद्दविस्तारामुळे मेट्रो – मोनो प्रकल्प, ट्रान्स हार्बर लिंक, धरणांची कामं, नैना सिटी प्रकल्प, विरार ते अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्प, वसई -विरार नॉलेज ग्रोथ सेंटर या महत्वाच्या प्रकल्पांना एमएमआरडीए मार्फत निधी आणि चालना मिळणार आहे.

…तर एमएमआरडीएची हद्द मुरबाडपर्यंत वाढवू

आज मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांपर्यंत हद्द वाढवण्याची मागणी देखील विधानपरिषदेमध्ये करण्यात आली. तशी गरज भासल्यास एमएमआरडीएची हद्द मुरबाडपर्यंत वाढवू, असे मत देखील योगेश सागर यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: June 20, 2019 6:51 PM
Exit mobile version