मनसे भाजपसोबत जाणार? पाहा काय म्हणाले गिरीश महाजन!

मनसे भाजपसोबत जाणार? पाहा काय म्हणाले गिरीश महाजन!

राज ठाकरे देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली असून, राज्यात मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी बातमी ‘आपलं महानगर’ने दिल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून देखील महानगरच्या या वृत्ताला दुजोरा देणारी व्यक्तव्य येत आहेत. माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांनी देखील ‘आम्ही तर समविचारी पक्ष आहोत आणि राजकारणात काहीही होऊ शकतं’, असे सांगत मनसे-भाजप एकत्र येतील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘जर शिवसेना आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी हे एकत्र येऊ शकत असतील, तर मनसे आणि आमची तर विचार सरणी एकच आहे. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं’, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. ‘आपलं महानगर’शी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की ‘देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणं काही वाईट नाही. तसेच राजकारणात काहीही होऊ शकते. त्यात आम्ही तर दोन्ही पक्ष समविचारी आहोत’.

तर भाजप मनसे युती शक्य!

एकीकडे गिरीश महाजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राज ठाकरे यांची आमच्यासारखी वैचारिक भूमिका असेल तर भाजप-मनसे युती शक्य’ असल्याचे सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित यांच्यावर केलेल्या टिकेवर सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘याच राज ठाकरे यांनी मोदींचे गुजरातमध्ये जाऊन कौतुक देखील केले होते. नेत्यांची वैचारिक भूमिका आणि राजकीय भूमिका यात फरक असतो,’ असे सांगितले. तसेच, ‘जर मनसेची विचारधारा भाजपा विचारधारेसारखी असेल, तर का एकत्र येणार नाही?’ असा उलट प्रश्नच सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला!


हेही वाचा – राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; हाच का मनसेचा वेगळा पर्याय?
First Published on: January 8, 2020 3:42 PM
Exit mobile version