लोकलप्रवासासाठी मनसेची हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

लोकलप्रवासासाठी मनसेची हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

मुंबई लोकल प्रवासासाठी मनसेने मुंबई हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करून, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्य सरकारने 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहेत, तर 11 जिल्ह्यांतील निर्बंध नियम जैसे थे ठेवले आहेत. मात्र, मुंबई लोकलबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.

अशा परिस्थितीत मनसेने सातत्याने दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करू देण्याची मागणी केली होती. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.

First Published on: August 5, 2021 4:45 AM
Exit mobile version