ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून २ वर्ष तडीपारीची नोटीस

ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून २ वर्ष तडीपारीची नोटीस

मनसे नेते अविनाश जाधव

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. वसई-विरार महापालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीनंतर अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त करत या नोटीशीला न घाबरता माझे लोकांसाठीचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले.

ठाणे महापालिकेने कामावरुन काढलेल्या नर्सेसना न्याय मिळवून देण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेबाहेर आंदोलन करत असताना अविनाश जाधव यांना ही नोटीस देण्यात आली. यावेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. “मी अनेक वर्ष लोकांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. आतापर्यंत एकदाही मी स्वतःसाठी आंदोलन केले नाही. आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून कामासाठी ठाण्यात आलेल्या मुलींसाठी मी आंदोलन करत आहे. हे आंदोलन करत असताना मला तडीपारीची नोटीस पाठविण्यात आली आहे.”

आपला संताप व्यक्त करताना अविनाश जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत मी म्हणालो होतो. एकदिवस मला तडीपारीची नोटीस मिळेल. त्याप्रमाणे आज ती मिळाली आहे. लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे बक्षिस महाराष्ट्र सरकारने दिले असल्याचे ते म्हणाले. ५ ऑगस्टपासून मी कोकणासाठी मोफत बस सोडणार होतो, त्याआधी मला जिल्ह्यातून बाहेर काढले जात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नोटीस आली असली तरी इथून पुढेही लोकांसाठी असेच काम करत राहील, असेही जाधव यांनी सांगितले.

वसई-विरार महापालिकेच्या आंदोलनबद्दल ही नोटीस त्यांना बजावण्यात आली असली तरी ४ ऑगस्टपर्यंत विरारच्या उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मुदत अविनाश जाधव यांना देण्यात आली आहे.

First Published on: July 31, 2020 6:45 PM
Exit mobile version