मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडेंना घेतले ताब्यात

मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडेंना घेतले ताब्यात

संदीप देशपांडे यांना अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज, गुरुवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी त्यांना ईडीने नोटीस बजावली होती. मात्र त्यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कालपासूनच मनसैनिकांना पोलीस समज देत असून त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळीच पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून धरपकड सुरूच 

यावेळी संदीप देशपांडे यांनी इडियट हिटलर लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. त्यामुळेदेखील वाद उफाळून येऊ शकतो, या पार्श्वभूमीवर देशपांडे यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव मनसैनिकांच्या नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. संदीप देशपांडे यांच्यासह मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे आणि मनसे नेता संतोष धुरी यांच्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त 

राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष, म्हणजे दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात आणि राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीतही बदल करण्यात आले आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंजवरुन ईडी ऑफीसला जाणारा मार्ग बदलण्यात आला आहे.

First Published on: August 22, 2019 9:15 AM
Exit mobile version