नवमतदारांसाठी आता मनसेकडून ‘लेटर बॉम्ब’!

नवमतदारांसाठी आता मनसेकडून ‘लेटर बॉम्ब’!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लावा रे तो व्हिडिओ’ने धुमाकूळ माजविल्यानंतर मनसैनिक आता लेटर बॉम्बने मोदी विरोधात रान पेटविले आहे. मुंबईत हा ‘लेटर बॉम्ब’चा प्रयोग मनसैनिकांकडून करण्यात आला असून मुंबईतील नवमतदारांसाठी हा प्रयोग राबविण्यात आला आहे. या प्रयोगात ‘मनसेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान का करु नये’, या आशयाचे पत्र नवमतदारांना पाठविण्यात आले आहे. या पत्रात एकूण १६ मुद्यांचा समावेश असून मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पत्र शनिवारी २७ एप्रिलला पाठविली आहेत. मनसेचे अखिल चित्रे आणि मनसेचे रेल्वे कामगार सेनेचे सुनील आळशे यांच्या संकल्पनेतून हा ‘लेटर बॉम्ब’चा प्रयोग राबविण्यात आला आहे.

मनसैनिकांकडून पाठविण्यात आलेला पत्र

तुम्ही हे वाचलंत का? – मनसेने पुन्हा केली सरकारच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड

नवमतदारांना पाठवले पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही त्यांनी मोदी विरोधात सभा घेत संपूर्ण राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडिओ’चे आदेश देत मतदारांना मोदी मुक्त भारतासाठीचे आवाहन केले. या आवाहनानंतर मुंबईसह राज्यात मनसैनिकांनी वेगवेगळ्या पद्धतीत भाजप विरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली. मुंबईतही अनेक मनसैनिक थेट काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांनी शिवसेना आणि भाजप विरोधात हाक दिली. त्यानंतर आता मुंबईतील मनसैनिक एका नव्या प्रयोगासहीत मोदींचा विरोधात प्रचार केला आहे. मनसेचे वांद्रेचे उपविभागप्रमुख अखिल चित्रे यांनी नवमतदारांना पत्र पाठवून त्यांचे मत वळविण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील सुमारे १० हजारांहून अधिक मतदारांना हे पत्र पाठविण्यात आली असून मोदींना मत का देऊ नये याची माहिती देण्यात आली आहे. एकूण १६ मुद्यांचा या पत्रात समावेश आहे. ज्यात एलपीजीचे वाढलेले दर, जातीयवादीवर करण्यात येत असलेला प्रचार, दोन कोटी रोजगाराचे दिलेले आश्वासन, राफेल करार, पातंजलीला केलेली मदत, इंधनदरवाढ अशा अनेक गोष्टींचा समावेश या पत्रात करण्यात आलेला आहे. ‘मोदी हटाव…देश बचावा’ अशा घोषणा देखील या पत्रात देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – भाजप सरकारची फसवेगिरी पुन्हा उघड; मनसेने दिला पुरावा

तीन भाषेतून पाठविले पत्र

दरम्यान, याबद्दल अखिल चित्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज साहेबांनी मोदी मुक्त भारताची घोषणा दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही हे पत्र पाठविले आहेत. नवमतदारांमध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी मोदींना मतदान करु नये, यासाठी आम्ही हे पत्र पाठविले आहे. मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेत हे पत्र आहेत. त्यात तरुणांनी मोदींना मत का देऊ नये, याची कारणे देण्यात आली आहेत. त्याचा फायदा आम्हांला नक्की होईल, असे मत अखिल चित्रे यांनी यावेळी आपलं महानगरशी बोलताना जाहीर केले. दरम्यान, पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसर पट्यातील नवमतदांराना हे पत्र पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

First Published on: April 27, 2019 8:51 PM
Exit mobile version