महाअधिवेशनासाठी मनसे अतिदक्ष; पदाधिकाऱ्यांना खास बारकोड!

महाअधिवेशनासाठी मनसे अतिदक्ष; पदाधिकाऱ्यांना खास बारकोड!

मनेसेचं महाअधिवेशन येत्या २३ जानेवारीला मुंबई येथील गोरेगाव संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी दिशा जाहीर करणार का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून अधिवेशनासाठी तयारी सुरू केली आहे. हे महाअधिवेशन सुरळीत पार पडावे, यासाठी मनसेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या महाअधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला बारकोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. यासाठी महाअधिवेशनाला येणाऱ्यांची यादी देण्यात यावी, असे आदेश सर्व विभाग अध्यक्षांना देण्यात आले आहेत. या यादीनुसारच ओळखपत्रं बनवण्यात येणार असून, त्यावर विशेष बोरकोड लावण्यात येणार आहे.

कशी असेल ‘बारकोड सिस्टीम’?

ओळखपत्रावरील बारकोड स्कॅन करून अधिवेशनाला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश दिला जाणार आहे. बारकोड असलेल्या ओळखपत्रावर पदाधिकाऱ्याचे नाव, मोबईल नंबर आणि त्याचे पद असणार आहे. ज्याची नोंद बारकोडमध्ये देखील असणार आहे. शनिवारी दादर येथील राजगडावर मनसेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्व विभाग अध्यक्ष, पुरुष आणि महिला, सरचिटणीस, उपाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी

मनसेच्या या महाअधिवेशनाला ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मुंबईतील विभाग अध्यक्ष, तसेच मनसेच्या मुंबईतील इतर पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या अधिवेशनाला मनसेच्या सर्व नेत्यांसह शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, गटनेते, उपविभाग अध्यक्ष, सरचिटणीस तसेच मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


वाचा सविस्तर – होय, आम्ही कमी पडलो; पण आता पक्ष बांधायचाय-बाळा नांदगावकर

असा असेल महाअधिवेशनाचा कार्यक्रम…

सकाळी १० वाजेपर्यंत सगळ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर पक्षाचे नेते तसेच इतर मान्यवर मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारच्या सत्रात पक्षाचे काही नवीन ठराव मांडण्यात येणार असून, त्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण होणार असून, यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच पक्षाची भूमिका मांडतील.

महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाची रुपरेषा ठरली असून, आम्ही सर्व विभाग अध्यक्षांना येणाऱ्या लोकांची यादी द्यायला सांगितली आहे. या यादीनुसार ओळखपत्र बनवून हे ओळखपत्र बारकोड पद्धतीचे असणार आहे.

यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसे


हेही वाचा – मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार!
First Published on: January 11, 2020 9:14 PM
Exit mobile version