घरमहाराष्ट्रमनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार!

मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार!

Subscribe

पक्ष हिंदुत्त्वाच्या वाटेवर... ,मराठी कार्ड प्रभावी ठरले नाही,भाजपबाबतही राज ठाकरे मवाळ होण्याची शक्यता

हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी ९ मार्च २००६ साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. मात्र जसाजसा काळ लोटला तसतसे मनसेचे हे मराठी कार्ड प्रभावी ठरताना दिसले नाही. याचाच परिणाम गेल्या काही निवडणुकांमध्ये पहायला मिळाला. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचा फक्त एकच आमदार निवडून आणण्यात यश आले. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढची राजकीय खेळी खेळणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्याचसोबत आता मनसेच्या झेंड्यांचा रंगही भगवा किंवा केशरी असा करण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

भाजपबाबतही राज ठाकरे मवाळ होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना आपले लक्ष केले होते. मात्र निकाल लागल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघडीची सत्ता स्थापन केली.

- Advertisement -

त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत संभ्रमात असून, मनसेने कुठल्या तरी एका विचारसरणीच्या पक्षासोबत जाऊन राजकारण करायला हवे असे कार्यकर्त्याचे मत आहे. त्यामुळेच पक्षवाढीसाठी आणि भविष्यात येणार्‍या मुंबई महानगर पालिका निवडणूक आणि इतर पालिका निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे यांची भाजपबाबत असलेली भूमिका मवाळ होण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षातील काही नेत्यांची याला सहमती असली तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सर्व अवलंबून असल्याचे काही नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

भगवा किंवा केसरी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुत्त्वाच्या वाटेवर असलेल्या मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा केसरी यापैकी एक असेल. लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यावर सध्या मनसेमध्ये चर्चा सुरू आहे. येत्या २३ जानेवारीच्या महाअधिवेनातच मनसेचा हा नवा झेंडा सगळ्यांच्या समोर येईल, अशी माहिती आहे. हिंदू, मुस्लीम आणि दलित असे तीन मतदार डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा असा ठेवला होता. मात्र आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे दुखावलेल्या कट्टर हिंदुत्व मतदारांना खेचण्यासाठी मनसे हिंदुत्त्वाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हिंदुत्त्वाच्या वाटेवर असणार्‍या मनसेच्या झेंड्याचा रंगही बदलण्याचा विचार मनसेमध्ये सुरू आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी पक्षाचे पहिले महाअधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आयोजित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -