कोळी बांधवांची आयुक्तांबरोबरची बैठक राज ठाकरेंनी ५ मिनिटात गुंडाळली

कोळी बांधवांची आयुक्तांबरोबरची बैठक राज ठाकरेंनी ५ मिनिटात गुंडाळली

राज ठाकरेंना कोळी महिला भेटताच शिवसेनेला आली जाग

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महापालिकेची छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक असल्याने येथील मासळी विक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका येथे हलवण्यासाठी बजावलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली. परंतु आजवरच्या बैठकीत आयुक्तांसोबत अनेक मिनिटे चर्चा करणारे राज ठाकरे अवघ्या ५ मिनिटांतच आयुक्तांच्या दालनातून बाहेर पडले. आयुक्तांनी या मासळी विक्रेत्यांचे तात्पुरती पुनवर्सन करण्यात येत असून पुन्हा याच मंडईत त्यांना जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु त्यांनी पुढे चर्चाच थांबवून राज ठाकरे दालनाबाहेर पडल्याचे बोलले जात आहे.

शिवाजी मंडईमधील कोळी महिलांचे पुनवर्सना तात्पुरतेच

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील कोळी महिला विक्रेत्यांच्या स्थलांतराचा मुद्दा मनसे आणि शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. कोळी महिलांनी गुरूवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पालिकेकडून कितीही नोटीस येऊ दे, तुम्ही अजिबात हलायचे नाही, असा सल्ला देत आपण लवकरच यासंदर्भात आयुक्तांची भेट घेवून हा मुद्दा मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासोबत दालनात बैठक घेत. स्टॅक समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे स्थलांतर करू नये, असे आश्वासन देत त्यांचे तात्पुरते पुनर्वसन याच परिसरात केले जावे, असे आदेश दिले होते. त्यानंतर कोळी बांधवांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारी दुपारी राज ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन कोळी महिलांचा प्रश्न मांडला. यावेळी सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कोळी महिला विक्रेत्या उपस्थित होत्या.

कोळी महिलांचे मुंबईतच पुनर्वसन करून, त्यांना पुन्हा पुनर्विकास करण्यात येणार्‍या मंडईत आणावे, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. कोळी महिला वर्षानुवर्षे घाऊक मच्छीविक्रेत्यांकडून तर कधी ससून गोदी कुलाबा आणि कसारा गोदी, भाऊचा धक्का येथून मासळी विकत घेतात आणि किरकोळ पद्धतीने छत्रपती शिवाजी मंडईत विक्री करतात. ऐरोली नाका मुंबईपासून सुमारे २० ते २५ किलोमीटर लांब आहे. तेथे जाणे सामान्य कोळी महिलांना शक्य नसल्याचेही ठाकरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाजी मंडईतील कोळी महिला विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. मंडईचे नुतनीकरण पुर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी आणले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

सकारात्मक उत्तर न मिळाल्याने बैठक ५ मिनिटात आटोपली

मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांची आयुक्तांसोबतची ही सदिच्छा भेट होती. सदिच्छा भेटीबरोबरच राज ठाकरे यांनी कोळी बांधवांचा मुद्दा रेटला. परंतु आयुक्तांचे उत्तर ऐकताच राज ठाकरे यांनी पुढील चर्चा न करता थेट दालनाबाहेरचा रस्ता पकडला. ऐरव्ही सदिच्छा भेटीला जाणारे राज ठाकरे हे चायपान केल्याशिवाय बाहेर पडत नाही. परंतु या आयुक्तांकडून त्यांना सकारात्मक उत्तर न मिळाल्याने ते अवघ्या पाचच मिनिटांमध्ये दालनातून बाहेर पडले, असे बोलले जाते. त्यामुळे कोळीबांधवांच्या मुद्दयावरून आता राज ठाकरे अधिक आक्रमक होतात की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवाजी मंडईत राज ठाकरे गेलेच नाही

राज ठाकरे हे प्रारंभी शिवाजी मंडईत कोळी भगिनींना भेटणार होते. तिथून आयुक्तांना भेटायला येणार होते. परंतु, ते कोळी बांधवांना भेटायला गेलेच नाही. त्यामुळे मुख्यालयावर आलेल्या कोळी भगिनींना भेटून त्यांना आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती दिली.


हेही वाचा – राज ठाकरे कोळी बांधवांना म्हणाले; ‘कुणीही येऊ दे, तुम्ही तिथून हलू नका’!


First Published on: July 22, 2019 8:58 PM
Exit mobile version