एक दिवसाच्या नर्स! महापौरांची नौटंकी शिवसेनेला मान्य?

एक दिवसाच्या नर्स! महापौरांची नौटंकी शिवसेनेला मान्य?

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी क्वारंटाईनमधून थेट नर्सचा पोशाख चढवत बाहेर इन्ट्री मारली आणि प्रसिद्धीझोतात पुन्हा आल्या. परंतु प्रसिद्धी मिळवून घेतल्यानंतर महापौरांना आपल्यातील नर्सच्या सेवेचा विसर पडला. रुग्णसेवा देण्यासाठी आणि परिचारिकांना मार्गदर्शन करण्यासाठी अंगावर नर्सचा पोशाख चढवणाऱ्या महापौरांनी आता युवराजांच्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेत रुग्णालयांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंगावर परिचारिकेचा चढवलेला पोशाख हा केवळ नौटंकीसाठीच होता का?, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पारिचारिकेच्या भूमिकेबद्दल खुद्द युवा नेते मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर कौतुक केले होते. त्यामुळे शिवसेनेत असल्या नोटंकीचेही कौतुक होते का?, असाही सवाल सर्वस्तरातून केला जात आहे.

भेटी देऊन तेथील आढावा घेण्याचा प्रयत्न

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका व्हिडीओमार्फत आपण स्वत:ला क्वारंटाईन करून घेत असल्याचे म्हटले होते. काही पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेताना, यापुढे १४ दिवस मी आणि माझा स्टाफ क्वारंटाईनमध्ये घरीच राहणार आहे. इथूनच काम करणार आहे. पुढे पाच दिवसांनी सर्वांची चाचणीही करून घेवू. कोणीही काळजी करून नये. आम्ही खबरदारीचा भाग म्हणून घरीच क्वारंटाईन करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अवघ्या आठ दिवसांमध्ये महापौर परिचारिकेच्या पोशाखात थेट नायर रुग्णालयात अवतरल्या आणि शिकावू परिचारिकांना त्यांनी मार्गदर्शनही केले. महापौरांनी यासाठी नर्सचा पोशाख शिवून घेतला. परंतु, सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताच त्यांना रुग्णसेवेसाठी घेतलेल्या व्रताचा विसर पडला आणि त्यांनी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्यासह कुपर रुग्णालय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आढावा घेण्याचा प्रयत्न केला.

महापौर क्वारंटाईन होण्यापूर्वी के-पूर्व आणि के-पश्चिम विभागातील नगरसेवकांची बैठक घेत आढावा घेतला होता. त्यामुळे पुन्हा क्वारंटाईन कालावधी हा १४ दिवसांचा असताना, अवघ्या आठ दिवसांमध्ये त्यांना बाहेर जाण्यास कुणी परवानगी दिली. तसेच नायर रुग्णालयात अशाप्रकारे परिचारिकेच्या पोशाखात जाऊन मार्गदर्शन करण्यास कुणी मान्यता दिली? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महापौर या जेएनपीटीच्या रुग्णालयातील माजी परिचारिका असल्या तरी नायर रुग्णालयात त्यांना नर्स म्हणून कुणाच्या परवानगीने प्रवेश दिला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, महापौर पुन्हा जुन्या परिचारिकेच्या भूमिकेत जाताना त्यांनी केवळ डोळ्यासमोर प्रसिद्धीच ठेवली होती. रुग्णसेवा कायम न ठेवता त्यांनी एकप्रकारे संपूर्ण मुंबईकरांच्या भावेनशी खेळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांकडून व्यक्त होत आहेत. महापौरांनी केवळ प्रसिद्धीकरता ही नौटंकी केल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून जर पुन्हा नर्सच्या पोशाख चढवल्यानंतर ज्यांनी त्यांचे कौतुक केले तेच आता या महापौरांच्या नौटंकीवर हसताना दिसत आहे.

ही नौटंकी आता शिवसेनेला तरी मान्य आहे का?

कल्याण-डोंबिवलीच्या महापौर वनिता राणे या पूर्वाश्रमीच्या नायरमधील परिचारिका होत्या. त्यामुळे त्यांना तिथे सेवा करण्याचा अधिकार आहे. परंतु मुंबईच्या महापौरांनी अधिकार नसतानाही तिथे अशाप्रकारे एंट्री करताना किमान रुग्णसेवेची व्रत कायम ठेवले असते. तर शिवसेनेची लाज राखली गेली असती. परंतु महापौरांची ही नौटंकी आता शिवसेनेला तरी मान्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.


हेही वाचा – बिबट्याने चिमुकल्याला ऊसाच्या शेतात ओढत नेत केले ठार


First Published on: May 1, 2020 10:40 PM
Exit mobile version