मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेतील मारक बाबींवर भाजपचा आक्षेप

मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेतील मारक बाबींवर भाजपचा आक्षेप

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिकेने वाढीव प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांना मान्यता देत अनेक प्रभागात पुनर्रचना केली आहे. त्यापैकी काही प्रभागात जाणीवपूर्वक काही बदल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेला जास्त लाभ मिळणार असून भाजपला नुकसानदायक ठरणार आहे. त्यामुळे भाजप काही प्रभागांबाबत हरकती आणि सूचना नोंदविणार आहे. त्यास पालिकेने योग्य न्याय न दिल्यास भाजप न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, आमदार मिहीर कोटेचा, आमदार राजहंस सिंह आणि भाजपचे पालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी दिला आहे.

पालिकेच्या निवडणुकीसाठी २३६ प्रभागांचे पुनर्रचना प्रारुप जाहीर करण्यात आले आहे. पुनर्रचनेत सर्व प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले असून सिमारेषाही बदलल्या आहेत. त्यात भाजपचे मुलुंड येथील नगरसेवक निल सोमय्या यांच्या प्रभागात जाणीवपुर्वक बदल करण्यात आले आहेत. तसेच भाजपच्या आणखीन काही नगरसेवकांच्या प्रभागातही काही भाग बदलण्यात आला आहे. राजकीय हेतूने प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा फटका भाजपच्या नगरसेवकांना बसणार आहे.

वास्तविक, प्रभाग पुनर्रचना करताना हायवे, रेल्वे मार्ग, रस्ते, नाले यांबाबत जे काही नियम आहेत त्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभाकर शिंदे आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली. या प्रभाग पुनर्रचनेविरोधात भाजप नगरसेवक हरकती आणि सूचना देणार आहेत, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. माझा वार्ड मुलुंडमध्ये असून रेल्वेच्या दोन्ही बाजूला विभागण्यात आला आहे. माझा विभाग ५ किलोमीटर इतका करण्यात आला आहे. रेल्वेच्या पलीकडील ३० ते ४० टक्के भाग त्यांच्या विभागात समाविष्ट केला आहे. तसेच, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव आणि नगरसेवक निल सोमय्या यांनाही या प्रभाग पुनर्रचनेचा फटका बसणार आहे. निल सोमय्या ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागातील १० बूथ काढून माझ्या यांच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे निल सोमय्या यांच्या विभागात ४७ हजार मतदार तर माझ्या प्रभागात ६० हजार मतदार झाले आहेत, अशी माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.


हेही वाचा – BMC Budget 2022: उद्या मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; उत्पन्न वाढीचे आव्हान; आरोग्य, नागरी सेवांवर भर


First Published on: February 2, 2022 11:09 PM
Exit mobile version