घरताज्या घडामोडीBMC Budget 2022: आज मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; उत्पन्न वाढीचे आव्हान;...

BMC Budget 2022: आज मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार; उत्पन्न वाढीचे आव्हान; आरोग्य, नागरी सेवांवर भर

Subscribe

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा सन २०२२- २३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल चहल हे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. तत्पूर्वी, शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सकाळी १० वाजता सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्पही शिलकीचा आणि अंदाजे १० टक्के जास्त रकमेचा म्हणजेच ४१-४२ हजार कोटींचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, निवडणूक तोंडावर आल्याने या अर्थसंकल्पात काही नवीन योजना, प्रकल्प, विकासकामे, संकल्पना राबविण्यावत जोर दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईत गेल्या २ वर्षांपासून कोविडचा मुक्काम आहे. त्याचा मुंबईतील विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कोविडला रोखण्यासाठी आणि साथीचे आजार पाहता आरोग्य सेवांसाठी मोठी भरीव तरतुद केली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, नागरी सेवा सुविधा, पायाभूत सुविधा, प्रकल्प आदींवर भर दिला जाईल. विशेषतः १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्चाच्या कोस्टल रोडचे काम ४० टक्केपर्यंत झाले असून त्याच्या उर्वरित कामांसाठी मोठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड हा सत्ताधारी शिवसेनेसाठी व राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रकल्प आहे.

- Advertisement -

तसेच, सेनेचे युवराज व पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सायकल ट्रकचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. उद्याने, मैदाने, वाहतूक, बेटे यांच्या विकास कामांवरही काही प्रमाणात भर दिला जाईल. तसेच, रस्ते, पटपथ दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवासुविधा अंतर्गत रुग्णालयांत जास्तीत जास्त सेवासुविधा देणे, दर्जेदार औषधोपचार देणे आदींवर भर दिला जाणार आहे. तसेच, प्रशासकीय खर्चात बचत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, नवीन पूल, धोकादायक, जीर्ण पुलांची दुरुस्तीकामे आदींसाठीही भरीव तरतूद असणार आहे.

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव तरतूद

केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरीत लवाद यांनी मुंबईतील प्रदूषण, प्रदूषित नद्या, समुद्र, खाडी परिसर यांची गंभीर दखल घेतली जाऊन पालिकेवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेला खडबडून जागे करीत नद्यांना प्रदूषण मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. मिठी, दहिसर, पोयसर, वालभट या नद्यांमधील सांडपाणी रोखून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नदी परिसर सुशोभीकरण करण्यासाठी भरीव तरतूद असणार आहे.

- Advertisement -

उत्पन्न वाढीचे आव्हान

मुंबई महापालिकेची जकात कर पद्धती २०१७ मध्ये बंद होऊन जीएसटी कर पद्धत लागू झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्वाधिक उत्पन्न स्त्रोत बंद झाल्यानंतर पालिकेला नुकसान भरपाई म्हणून जीएसटी उत्पन्नातील हप्ता दरमहा दिला जात आहे. २०२२ अखेरपर्यंत हा हप्ता दिला जाणार आहे. हा हप्ता तसाच सुरू ठेवला तर ठीक आहे. मात्र जर हप्ता बंद झाला, तर पालिकेवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्याला पर्याय म्हणून काही तरी उत्पन्न वाढीचा मार्ग शोधणे भाग आहे. निवडणूक जवळ आल्याने पालिका या अर्थसंकल्पात थेट नव्हे पण छुपी कर अथवा दर वाढ होण्याची अथवा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही महिन्यांनी कर किंवा दर वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पालिका उत्पन्न वाढविण्यासाठी नव्याने विशेष प्रयत्न करणार असल्याचे दिसते. तसेच, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर, पाणीपट्ट, विकास शुल्क थकबाकी वसुलीसाठी झपाट्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

बेस्टला आर्थिक मदत

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला टिकविण्यासाठी मुंबई महापालिका ६ हजार कोटींची आर्थिक मदत करणार आहे. मुंबईकरांना चांगली बेस्ट बस सेवा देण्यासाठी सहभागातून ३ हजार बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. वीज विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मालमत्ता कर माफी

मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौ.फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी जे वचन दिले होते, त्याची पूर्तता कायदेशीर मार्गाने केली जात आहे. तसेच, यापुढे ७०० – ७५० चौ. फुटांच्या घरानाही मालमत्ता कर माफी देण्याची भाजप आणि काँग्रेस पक्ष यांची मागणी असून त्याबाबत पालिका काय निर्णय घेणार ते या अर्थसंकल्पातून समोर येणार आहे.

पुरमुक्त मुंबईसाठी प्रयत्न

मुंबईत दरवर्षी अतिवृष्टी झाल्यास पूर स्थिती निर्माण होते. त्याचा रस्ते व रेल्वे वाहतुकीवर आणि एकूणच जनजीवनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे मुंबईला पुरमुक्त करण्यासाठी, नाले रुंदीकरण, खोलीकरण, माहुल व मोगरा हे दोन नवीन पंपिंग स्टेशन लवकरात लवकर उभारण्यासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

दर्जेदार डिजिटल शिक्षणासाठी तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पात दर्जेदार आणि डिजिटल शिक्षणासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा सुरू करण्यात येतील.

कचरामुक्त मुंबईसाठी प्रयत्न

मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण एक ते दीड हजार मेट्रिक टनने कमी झाले आहे. कचऱ्याची विल्हेवाट प्रत्येक प्रभागातच लावण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. डंपिंग ग्राउंड कचरामुक्त करून यापुढे कचऱ्याची विल्हेवाट मुंबईबाहेर लावण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

महापौर, गटनेते यांच्या नागरी विकासकामांबाबत अपेक्षा

मुंबईकरांना ५०० चौ. फुटांच्या घरासाठी मालमत्ता कर माफी देण्याबाबत शिवसेनेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. आता मुंबईकरांना मुबलक पाणी, प्रदूषणमुक्त हवामान, नद्या देण्याचा प्रयत्न आहे. तसेच, दर्जेदार रस्ते , उद्याने, मैदाने, शिक्षण आणि आरोग्य सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे, घनकचरा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. चांगल्या नागरी सुविधा, कोस्टल रोड आदी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या

मुंबईतील रखडलेली विकासकामे, प्रकल्प, धोरणे आदीबाबत ज्या अडचणी आहेत त्या दूर करून ती तातडीने मार्गी लावणे. मुंबईकरांना मुबलक पाणी देणे. चांगल्या आरोग्यसुविधा, रस्ते, शिक्षण देणे. मालमत्ता कर दात्याना अधिकाधिक सेवासुविधा देणे. आरोग्य सुविधा वाढविणे, त्यासाठी भरीव निधीची तरतूद करणे. प्रदूषणमुक्त, खड्डेमुक्त आणि पुरमुक्त मुंबई देणे यासाठी पालिकेने आवश्यक उपाययोजना करणे आदी बाबी यंदाच्या अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत, असे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले.

यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वपक्षीय नगरसेवकांना समान निधीचे वाटप व्हायला हवे. ५०० चौ. फुटांच्या घरांना ज्याप्रमाणे मालमत्ता करमाफी दिली तशी ७०० चौ. फुटांच्या घरांनाही कर माफी देण्याबाबत भाजपने केलेल्या मागणीची पूर्तता करणे. दर्जेदार रस्ते, उद्याने, शिक्षण असावे. खड्डे मुक्त रस्ते असावेत. मराठी शाळा, भाषा यांचे संवर्धन व्हावे. मुंबईकरांना चांगल्या सेवासुविधा देणे. २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत दिलेल्या वचनाची सत्ताधारी पक्षाने पुर्तता करावी, अशी अपेक्षा आहे, असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले.

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कोविडने थैमान घातले आहे. त्याचा विकासकामांवर काहीसा परिणाम झालेला आहे. त्यामुळे कोविडला कायमस्वरूपी हद्दपार कारण्यासाठी आणि मुंबईकरांना वाचविण्यासाठी ठोस आरोग्य सुविधा, उपाययोजना असाव्यात. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. मुंबईकरांना मुबलक आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मुंबईला पावसाळ्यात पाणी साचल्याने होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी नाल्यांची कामे युद्धपातळीवर करावीत. पावसाचे साचलेले पाणी निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन वाढवून थोडं उपाययोजना करावी. पाणी टंचाई दूर करावी. खड्डे मुक्त व दर्जेदार रस्ते बनवून द्यावेत, आदी अपेक्षा या अर्थसंकल्पातून आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या.  


हेही वाचा – युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -