मुंबईकरांना लवकरच मिळणार कोरोनाची लस; ७६२ मास्टर ट्रेनर तयार

मुंबईकरांना लवकरच मिळणार कोरोनाची लस; ७६२ मास्टर ट्रेनर तयार

कोरोना

साल २०२० हे कोरोनाचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. मात्र, आता २०२१ वर्षाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीयांना आनंदाची बातमी मिळाली. भारतात पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईत कोरोनावरील लसीकरणासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईकरांना पाच टप्प्यांत लस देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १.२५ लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. या लसीकरणासाठी महापालिकेने गेल्या १४ दिवसांत ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. तसेच, आतापर्यंत २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

देशासह मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हावी यासाठी उपाययोजना सुरु आहेत. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून मृत्यूदरही कमी झाला आहे. आता कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. केंद्र सरकारने लस पुरवल्यानंतर आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. मुंबईकरांना पाच टप्प्यांत लस देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १.२५ लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल.

लसीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने १८ डिसेंबरपासून जी/उत्तर वॉर्डमधील धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक वॉर्डमध्ये देण्यात आले. पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये सुरू असलेली प्रशिक्षणाची प्रक्रिया आज (शुक्रवार) पूर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून येथे एकाच वेळी १५ लाख लसींचा साठा करता येणार असल्याचेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.

First Published on: January 1, 2021 7:11 PM
Exit mobile version