मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता जोरदार पावलं उचलायला सुरुवात केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात जमावबंदी लागू केल्यानंतर आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग असे या दोन शहरांना जोडणारे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींनाच सोडलं जात आहे. यासाठी खारघर, कळंबोली अशा नाक्यांवर पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला पोलीस विचारणा करत आहेत. जर ती व्यक्ती अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी नसेल, तर तिला पुन्हा माघारी पाठवलं जात आहे. मात्र, असं असताना या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडल्यामुळे त्यांना थांबवताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.

बेजबाबदार मुंबईकर!

रविवारी दिवसभर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र, जनता कर्फ्यू संपताच नागरिक मोठ्या संख्येनं घरातून बाहेर पडल्याचं चित्र सोमवारी सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे चित्र पाहिल्यानंतर नागरिकांना सरकारने जाहीर केलेली जमावबंदी आणि इतर सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, जर सांगून देखील नागरिकांनी नियम पाळले नाहीत, ते कारण नसताना किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी नसताना देखील ते घराबाहेर पडले, तर मात्र नाईलाजाने पोलीस कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील आरोग्यमंत्र्यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.


वाचा सविस्तर – रुग्ण वाढले, पण अजून तिसरी स्टेज नाही; फक्त काळजी घेणं गरजेचं-आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
First Published on: March 23, 2020 12:35 PM
Exit mobile version