मुंबईत शनिवारी धो-धो; येत्या दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट

मुंबईत शनिवारी धो-धो; येत्या दोन दिवसांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट

मुंबईला पावसाने झोडपले; रेल्वे, रस्ते सेवा विस्कळीत (फाईल फोटो)

मुंबईत शनिवारी सकाळपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते व मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कुर्ला व सायन रेल्वे मार्गावर काही प्रमाणात पाणी साचल्याने मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास झाला. तसेच शहर व उपनगरातील किंग्जसर्कल, हिंदमाता, कुर्ला, सायन, दहिसर, वडाळा, माटुंगा, अंधेरी सब वे आदी सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचले. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला परिवहन विभागाला १७ ठिकाणांहून होणारी ६९ बस गाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली.

मुंबई महापालिकेने सखल भागात साचलेल्या पाण्याचा मोठ्या पंपाच्या व अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल्या छोट्या पंपाच्या साहाय्याने निचरा केला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूकही सुरळीत झाली. आगामी ४८ तासांत मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी बाहेरील वातावरण पाहून केवळ अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

दरम्यान, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात २४.३३ मिमी, पूर्व उपनगरात ६०.८० मिमी आणि पश्चिम उपनगरात ३८.९४ मिमी इतक्या पावसाची नोंद पालिकेच्या पर्जन्य जलमापक यंत्रावर नोंदविण्यात आली आहे. चेंबूर, गौतम नगर येथे घराची पडझड झाल्याची घटना घडली आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते.

सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहर भागात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ ठिकाणी अशा ५ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शहर भागात ४ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात २ ठिकाणी अशा ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत; मात्र त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

First Published on: June 12, 2021 10:53 PM
Exit mobile version