पाणी जपून वापरा; मुंबईच्या काही भागात आज १५ टक्के पाणी कपात

पाणी जपून वापरा; मुंबईच्या काही भागात आज १५ टक्के पाणी कपात

तांत्रिक बिघाडामुळे आज मुंबई पूर्व उपनगरातील रहिवाशांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या पीसे आणि पांजरपोळ या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पूर्व उपनगरात आज १५ टक्के पाणी कपात असेल असे मुंबई महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी मुंबई उपनगरात कुर्ला ते मुलुंड याठिकाणी १५ टक्के पाणी कपात असेल. त्यामध्ये चेंबुर आणि मानखुर्दचाही समावेश असणार आहे.

या वॉर्डात पाणी कपात

तब्बल २४ तासांसाठी ही पाणी कपात असेल मुंबई महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयाने जाहीर केले आहे. १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही १५ टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या टी, एस, एन, एल, एम ईस्ट, एम वेस्ट यासारख्या विभागातील रहिवाशांना कमी दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे. मुंबई उपनगरात पाणी पुरवणाऱ्या बॉम्बे २ या पारेषण वाहिनीशी संबंधित असणाऱ्या रहिवाशांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागेल.

अवघ्या काही दिवसातच उपनगरात दुसऱ्यांदा पाणी कपातीच्या संकटाला सामना करावा लागत आहे. याआधीही भांडूप एलबीएस मार्ग येथे ९०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या दीर्घकाळ चाललेल्या कामामुळे उपनगरवासीयांची गैरसोय झाली होती. पूर्व उपनगरात एस आणि एन विभागातील रहिवाशांना तीन दिवस पाण्याअभावी राहण्याची वेळ या कामामुळे ओढावली होती. त्यापाठोपाठ आजही पाणी कपातीचा सामना करण्याची वेळ येणार आहे.

First Published on: February 17, 2020 12:01 PM
Exit mobile version