मुंबई विद्यापीठ आता हिंदुत्व शिकवणार, हिंदू अभ्यास केंद्रामार्फत ‘मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज’ अभ्यासक्रम सुरू

मुंबई विद्यापीठ आता हिंदुत्व शिकवणार, हिंदू अभ्यास केंद्रामार्फत ‘मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज’ अभ्यासक्रम सुरू

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर संशोधन करण्यासाठी अध्यसन केंद्र सुरू केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठ हिंदुत्व शिकवणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाने ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’ (हिंदू अभ्यास केंद्र) सुरू केले आहे. या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या प्रमुख तत्त्वांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये सुरू करण्यात येणार्‍या हिंदू अभ्यास केंद्राच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या प्रमुख तत्त्वांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये समस्त प्राणीमात्रांवर विचार करणारे तत्त्वज्ञान, ज्ञानशास्त्र आणि युक्तिवाद अशा विविध पैलूंवर या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. हिंदू धर्म कोणत्याही कर्मकांडाच्या पद्धतीत संकुचित करता येत नसून सार्वत्रिक शांतता, विश्वबंधुत्व, विविध विचार, श्रद्धा, कल्पना आणि प्रथा यांच्या शांततापूर्ण अस्तित्वावर विश्वास ठेवतो. सर्व सजीव आणि निर्जीव घटकांना एक परम अस्तित्व व एक कुटुंब म्हणून जगाचे रूप मानणे हे हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ठ्य असून अशा वैशिष्ठ्यपूर्ण घटकांचा अभ्यास करण्यासाठी हिंदू अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील बजाज भवन येथे नव्याने सुरू केलेल्या हिंदू अभ्यास केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यास केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या ‘मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज’ या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० एवढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत लवकरच प्रमाणपत्र, पदविका आणि पीएचडीचे अभ्यासक्रमही राबविले जाणार आहेत. भारतातील अनेक विद्यापीठांत हा अभ्यासक्रम शिकवला जात असून या विषयाचा नेट-सेट परीक्षेतही समावेश करण्यात आल्याची माहिती केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे यांनी दिली.

कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. तसेच कॉर्पोरेट्सना त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये वचनबद्धता, समर्पण आणि प्रेरणा विकसित करण्यासाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.
– डॉ. रविकांत सांगुर्डे, प्रभारी संचालक, हिंदू अभ्यास केंद्र

First Published on: June 23, 2022 5:00 AM
Exit mobile version