दिलासादायक! दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच होणार सुटका

दिलासादायक! दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच होणार सुटका

दक्षिण मुंबईतील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. या वाहतूक कोंडीमध्ये नेहमीच प्रवाशांना सामना करावा लागतो. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. ५ हजार ५६० मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात प्रगतीपथावर असून याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. (Mumbaikars will soon be relieved from the traffic jam in South Mumbai)

निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती महापालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे. उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो.

मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागतील. ही बाब लक्षात घेता दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व अधिक सुलभ करण्यासह अधिक वेगवान होण्यासही या प्रस्तावित उन्नत मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे.

या उन्नत मार्गाचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा मागवल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने पार पाडल्या जाणाऱ्या या निविदा प्रक्रियेची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या कामासाठी ६६२.४२ कोटी इतका खर्च अंदाजित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी ४२ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पूर्व मुक्तमार्गास जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होवून दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रस्तावित उन्नत मार्गाच्या उभारणींनंतर पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील; म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, अधिक सुलभ व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी महापालिकेला रुपये ६६२.४२ कोटी इतका खर्च अंदाजित आहे, अशीही माहिती पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.


हेही वाचा – शरद पवार निवडणूक आयोगावर कडाडले, वाजपेयींचा दाखला देत मोदींवरही निशाणा

First Published on: February 22, 2023 8:01 PM
Exit mobile version