मुरबाडमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुक! सेना-भाजप युतीवर उमेदवार ठरणार!

मुरबाडमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुक! सेना-भाजप युतीवर उमेदवार ठरणार!

मुरबाड विधानसभा मतदारसंघ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाच्या युतीच्या निर्णयाकडे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले आहेत. शिवसेना भाजपाची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली, तरी अद्याप जागावाटपाचा निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांच्या उमेदवारीच्या आशा कायम असून युतीबाबत काय निर्णय होतो? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे किसन कथोरे विद्यमान आमदार आहेत. कथोरे सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले असून यंदाही भाजपाकडून उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात २००५ मध्ये शिवसेनेच्या साबीरभाई शेख यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर किसन कथोरे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले होते.

मुरबाडमध्ये तीन नेत्यांमध्येच लढत!

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत अंबरनाथ मतदारसंघातील बराचसा भाग मुरबाड मतदार संघाला जोडल्या गेल्याने आणि आरक्षण बदलल्याने कथोरे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक मुरबाड मतदारसंघातून लढवली. त्यावेळी तत्कालीन आमदार गोटीराम पवार यांना डावलून राष्ट्रवादीने कथोरेंना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत विजय मिळवून ते दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला आणि या निवडणुकीतही विजय मिळवून आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली. मुरबाड मतदारसंघातील मागील दोन निवडणुका पाहता त्यांना माजी आमदार गोटीराम पवार आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

आकडेवारी काय सांगते?

२००९ च्या निवडणुकीत किसन कथोरे यांना ५५ हजार ८३०, अपक्ष निवडणूक लढवणारे गोटीराम पवार यांना ४९ हजार २८८, मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे वामन म्हात्रे याना ३७ हजार ८० आणि भाजपाचे दिगंबर विशे यांना २५ हजार २५८ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या सन २०१४ च्या निवडणुकीतही पुन्हा एकदा किसन कथोरे यांचा गोटीराम पवार आणि वामन म्हात्रे यांच्याशी सामना झाला. या निवडणुकीत किसन कथोरे ८५ हजार ५४३ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे गोटीराम पवार यांना ५९ हजार ३१३ तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना ५३ हजार ४९६ मते मिळाली.

यंदा अनेकांची उमेदवारीसाठी फिल्डींग!

शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभू पाटील, शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार आणि नगरसेवक शैलेश वडनेरे विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपासून शहरातील राजकीय वर्तुळात होत होती. दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आणि ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, अलीकडेच सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेनेकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी तेही इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाची युती झाल्यास आणि न झाल्यास उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत.

उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री ठरवणार!

First Published on: September 14, 2019 6:00 PM
Exit mobile version