माझेही मत …

माझेही मत …

election

उमेदवाराचे शिक्षण, कार्यानुभव महत्वाचा
जातीपातीवरील राजकारणाला पूर्णविराम मिळून, विकासाच्या मुद्द्यांवर उमेदवारांनी निवडणूक लढवावी. विशेषकरून देशातील ग्रामीण भागांचा आजही विकास न झाल्याचेच चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला येणार्‍या सरकारने प्राधान्य द्यावे. मागील काही वर्षात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. रोजगार निर्मितीसाठी देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून सल्ला घेऊन बेरोजगारीचा प्रश्न निकालात काढावा. दर ५ वर्षांनी मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी मतदारांना असते. त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ न फिरवता मतदानाचा हक्क बजवावा. तसेच मतदान करताना मतदाराने काही मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुकीच्या काळात दारोदारी मतांचा जोगवा मागणारे उमेदवार निवडणुकीनंतर मात्र मतदारसंघात फिरकत देखील नाहीत. असे न होता निवडून आलेल्या उमेदवारांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. त्यामुळे मतदारांनी मतदान करण्यापूर्वी पुन्हा जनतेकडे पाठ फिरविणार्‍या उमेदवारांना निवडून आणायचे का यावर विचार करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे शिक्षण, सामाजिक प्रश्नांची समज आणि उमेदवाराचा मागील कार्यानुभव आदी बाबतींचा विचार करून मतदाराने न विसरता मतदानाचा हक्क बजवावा.  -उमेश खरात, नोकरदार

शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यक
सरकारकडून जनकल्याणाच्या विविध योजना सुरु करण्यात येतात. मात्र अनेकदा योजनेच्या खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे सरकारच्या जनकल्याणाच्या धोरणावर शंका उपस्थित होते. तेव्हा योजनेच्या खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचावी यासाठी येणार्‍या सरकारने काम करावे. देशात शिक्षण क्षेत्रात काही महत्वपूर्ण बदल आवश्यक आहे. जसे कि, आज मोठ्या संख्येने विद्यार्थी पदवीधर म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. मात्र कौशल्याधारित शिक्षणाच्या अभावे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा कौशल्याधारित शिक्षणाची सुविधा सरकारने करणे महत्वाचे आहे. या सर्वासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून सक्षम उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे.  -सागर बनसोडे, नोकरदार

मतदानाकडे पाठ नको
लोकशाही प्रधान देशात नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविणे भूषणावह नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक काळात मोठया प्रमाणात आश्वासनांची खैरात केली जाते. मात्र निवडणुकीनंतर आश्वासने कागदोपत्री राहतात. राजकारण्यांच्या या राजकारणाला कंटाळून मतदार मतदान न करण्याचा निर्णय घेतो. मात्र मतदारांची हि भूमिका न पटणारी आहे. तेव्हा मतदारसंघातील सक्षम नेतृत्वगुण, उच्च शिक्षित तसेच सामाजिक कार्याची आवड असणार्‍या उमेदवाराची मतदारांनी निवड करावी. मतदान करणे हा नागरिकांचा हक्क नसून ते कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य न चुकता पूर्ण करावे. -सिद्धी वरक, गृहिणी

First Published on: April 24, 2019 4:04 AM
Exit mobile version