मुंबई महापालिकेच्या प्रयोग शाळेस राष्ट्रीय मानांकन

मुंबई महापालिकेच्या प्रयोग शाळेस राष्ट्रीय मानांकन

मुंबई : मुंबई महापालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्चून जी काही विकास कामे करण्यात येतात त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सिमेंट, सळई / लोखंड, खडी, विटा, रेती, लाकूड, लादी, डांबर, असफाल्‍ट, काँक्रिट इत्‍यादी बांधकाम साहित्‍यांचा दर्जा तपासण्यासाठी वरळी येथे एक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या साहित्‍य चाचणी प्रयोगशाळेची केंद्र शासनाच्‍या “राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ” या संस्‍थेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली. (National rating for Bombay Municipal Corporation’s Experimental School)

या प्रयोगशाळेत उपलब्ध सक्षम सल्‍लागार, तंत्रज्ञान व सोई-सुविधा यांचे निरीक्षण करून आणि तंत्रज्ञांचे परिक्षण करुन गुणवत्‍ता तपासण्‍यात आली. सदर तपासणीनंतर सदर प्रयोगशाळेची प्रशंसा करुन राष्‍ट्रीय मानांकनाचा दर्जा पारित करण्‍यात आला असून तसे प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे आता मुंबई महापालिकेची साहित्‍य चाचणी प्रयोगशाळा आता ‘राष्‍ट्रीय परीक्षण आणि अंश-शोधन प्रयोगशाळा’ (NABL) यांच्याद्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळा गणली गेली आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेची कार्यपद्धती

मुंबईत दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट, डांबरी रस्ते बांधणी, पालिका कार्यालय इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकास करणे, मलनि:सारण वाहिन्यांची कामे, नवीन जल वाहिनी टाकणे, जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती कामे, उद्यानाची कामे करण्यात येतात. या अरब कामांसाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट, सळई / लोखंड, खडी, विटा, रेती, लाकूड, लादी, डांबर, असफाल्‍ट, काँक्रिट इत्‍यादी बांधकाम साहित्‍यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र सदर विकासकामे दर्जेदार व्हावीत त्यासाठी या कामातील बांधकाम साहित्यांच्या नमुन्यांची चाचणी, परिक्षण करण्याचे काम वरळी येथील प्रयोगशाळेत तज्ज्ञांकडून करण्यात येते.

काँक्रिट दर्जा तपासणी क्षमता वाढविण्‍यासाठी दोन अत्‍याधुनिक संनियंत्रित व स्‍वयंचलित मशिनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सदर मशीन्‍स संनियंत्रित व स्‍वयंचलित असल्‍याने, चाचण्या करण्‍याचा वेग वाढला आहे. त्‍यामुळे अचूक चाचणी अहवाल कमीतकमी वेळेत उपलब्‍ध होत असून चाचणीचा दर्जा व विश्वासार्हता वाढली आहे. अशाप्रकारे नजीकच्‍या भविष्यकाळात चाचणी कामासाठी अनेक अत्‍याधुनिक यंत्र सामुग्री, उपकरणे व तंत्रज्ञान उपलब्‍ध करण्‍यात येणार असून बांधकाम साहित्‍यासाठी नवीन १५० चाचण्‍या वाढविण्‍यात येणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

म्‍हाडा, सिडकोच्या कामांमधील साहित्‍य चाचणी करण्‍याचा मानस

मुंबई महापालिकेच्या या प्रयोगशाळेत यापुढे शासकीय, निम-शासकीय (म्‍हाडा, सिडको, पीडब्‍ल्‍युडी इत्‍यादी) तसेच खासगी विकासक इत्‍यादी संस्‍थेकडून करण्‍यात येणा-या कामांमधील साहित्‍य चाचणी करण्‍याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. महापालिकेच्या प्रयोगशाळेत करण्‍यात येणा-या साहित्‍य चाचणीची यादी व त्‍यासाठी शुल्‍क रक्‍कमेचा तक्‍ता मुंबई महापालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर उपल्‍ब्‍ध असून ती यादी वेळोवेळी अद्यावत करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे महापालिकेच्‍या साहित्‍य चाचणी प्रयोगशाळेचा लाभ इतर संस्‍थांनाही घेणे शक्य आहे.

साहित्‍य चाचणीची सेवा होणार ऑनलाईन

अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साहित्‍य चाचणीची सेवा संपूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्‍यासाठी मोबाइल ॲपची व्‍यवस्‍था करण्‍यात येत असल्‍याने प्रयोगशाळेमध्‍ये चाचणीसाठी भरावे लागणारे शुल्‍क, चलन, चाचणी अहवाल इत्‍यादी कामे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत. त्‍यामुळे अचूक अहवाल कमीतकमी वेळेत संबंधितास ऑनलाईन पद्धतीने मोबाइलवरती किंवा ई-मेल वरती प्राप्‍त होईल.

महापालिकेच्‍या दक्षता विभागाच्‍या अखत्‍यारितील साहीत्‍य चाचणी प्रयोगशाळा राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ (NABL), करण्‍यासाठी तसेच तेथील सुविधा अत्‍याधुनिक करुन सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने करण्‍यासाठी सह आयुक्‍त (दक्षता) अजित कुंभार (भा.प्र.से.) व प्रमुख अभियंता (दक्षता) विनोद चिठोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता (दक्षता) शहर, शंकर भोसले तसेच सहाय्यक अभियंता (प्रयोगशाळा) महेंद्र सपकाळ व त्‍यांच्‍या चमुने विशेष प्रयत्‍न केल्‍याने मुंबई महापालिकेस अभिमानास्‍पद यश प्राप्‍त झाले.


हेही वाचा – विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ प्रकरणी भावना गवळी आक्रमक

First Published on: November 23, 2022 8:57 PM
Exit mobile version