मुंबई, नवी मुंबईत परतीच्या पावसाला सुरूवात

मुंबई, नवी मुंबईत परतीच्या पावसाला सुरूवात

प्रातिनिधीक फोटो (सौजन्य - इंडियन एक्सप्रेस)

राज्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मान्सून परतला आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई व आसपासच्या परिसरात आज संध्याकाळपासून सुरूवात झाली आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून उकाडयाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या मुसळधार सरींनी दिलासा दिला आहे. संध्याकाळच्या सुमारास आकाशात काळया ढगांची दाटी झाल्यानंतर मेघगर्जनेसह सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

बऱ्याच दिवसानंतर अचानक संध्याकाळच्या सुमारास पाऊस कोसळल्याने कामावरुन घरी निघालेले नोकरदार भांबावले. अनेकांनी पावसाळा संपला असे समजून छत्री किंवा रेनकोट सोबत बाळगणे बंद केले आहे. अशा लोकांना भिजतच घर गाठावे लागत आहे. सध्या मुंबईला सुद्धा पावसाची गरज आहे कारण मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमधील जलसाठयामध्ये तूर्तास तब्बल एका लाख दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता असून सुमारे एक महिन्याचा पाणीसाठा तलावांमध्ये कमी आहे. पुढील काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी न लावल्यास तलावांतील पाणी कमतरता कायम राहून उन्हाळ्यात पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

First Published on: October 17, 2018 8:28 PM
Exit mobile version