अखेर शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरच्या आरोपांवर भूमिका मांडली!

अखेर शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरच्या आरोपांवर भूमिका मांडली!

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर हे प्रकरण आता तापू लागलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. त्याला आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. ‘काल मुंडेंनी मला भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्थानकात त्यांच्याबद्दलची एक तक्रार आली. त्यासंबंधीची चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तिगत आरोप होतील असा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात भूमिका आधीच मांडली होती. त्यावर उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त करून घेतला आहे’, असं शरद पवार म्हणाले. वायबी सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

पक्ष म्हणून लवकरात लवकर पावलं उचलू

याविषयी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, ‘त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप गंभीर आहे. यासंबंधीचा विचार पक्ष म्हणून आम्हाला करावा लागेल. पक्षातल्या माझ्या प्रमुख सहकाऱ्यांशी माझं काही बोलणं झालेलं नाही. यासगळ्यांना मी विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडणार आहे. त्यावर माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती बाकीच्या सहकाऱ्यांना सांगून इतरांची मतं लक्षात घेऊन पुढची पावलं टाकणं. हे आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. कोर्टाचा जो निर्णय होईल, पोलीस तपास होईल, त्यात मी पडणार नाही. पण पक्ष म्हणून आम्हाला जी काही पावलं उचलावी लागतील, ती आम्ही नक्की उचलू’.

नवाब मलिकांवर व्यक्तिगत आरोप नाहीत

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीनं केलेल्या अटकेसंदर्भात देखील भूमिका स्पष्ट केली. ‘नवाब मलिक मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यांच्यावर व्यक्तिगत कोणताही आरोप नाही. त्यांच्या नातेवाईकांवर झालाय. त्यांना अटक देखील झाली आहे. त्यामुळे एनसीबीला पूर्ण सहकार्य करणं आणि वस्तुस्थिती समाजासमोर येणं आवश्यक आहे. संबंधित यंत्रणा तसं काम करेल अशी अपेक्षा आहे. नवाब मलिक यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. विधिमंडळात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. या पूर्ण काळात त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप झालेले नाहीत’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – धनंजय मुंडे प्रकरणावर राऊत म्हणाले, ‘पवार सुजाण नेते, योग्यच निर्णय घेतील’!
First Published on: January 14, 2021 2:02 PM
Exit mobile version