घरताज्या घडामोडीधनंजय मुंडे प्रकरणावर राऊत म्हणाले, 'पवार सुजाण नेते, योग्यच निर्णय घेतील'!

धनंजय मुंडे प्रकरणावर राऊत म्हणाले, ‘पवार सुजाण नेते, योग्यच निर्णय घेतील’!

Subscribe

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाल्याची देखील चर्चा ऐकायला मिळत असताना त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. ‘हा धनंजय मुंडेंचा कौटुंबिक प्रश्न आहे. राष्ट्रवादीचं मुख्य नेतृत्व सुजाण, प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत याचा अनुभव सर्वात जास्त राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांना आहे. धनंजय मुंडेंवर टीका करून, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल, असं जर कुणाला वाटत असेल, तर तो भ्रम आहे’,असं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.

‘हा विषय राजकीय नसून कौटुंबिक आहे. कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करू नये. राजकारणात खूप कष्ट, संघर्ष करावा लागतो. असं एका क्षणात त्या माणसाचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करणं राजकारणात होऊ नये’, असं देखील राऊत म्हणाले.

- Advertisement -

विरोधकांनी सदैव गोड राहावं!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मकर संक्रांतीच्या खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपसोबत २५ वर्ष आम्ही फार जवळून काम केलंय. आम्ही त्यांना त्या अर्थाने कधीही विरोधी पक्ष मानयला तयार नाही. भाजपला मी त्या अर्थाने विरोधी पक्ष कधीही मानलं नाही. राजकारणात जरी विरोधी पक्ष असले, तरी एकमेकांचे सहकारी असतात. त्यामुळे मी विरोधी पक्षांना सदैव त्यांनी गोड राहावं, गोड बोलावं, गोड हसावं, सरकारबद्दल गोड विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस यावेत अशा शुभेच्छा देतो’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -