रुग्णालयांमधले ‘ते’ ६ मृतदेह बेपत्ता नाहीच; पालिकेचा खुलासा!

रुग्णालयांमधले ‘ते’ ६ मृतदेह बेपत्ता नाहीच; पालिकेचा खुलासा!

कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता असलेल्या एका रुग्णाचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकावर आढळून आल्यानंतर त्यापाठोपाठच घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातून एक कोरोनाग्रस्ताचा मृतदेह बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यापाठोपाठ आत्तापर्यंत मुंबई महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांमधून कोरोनामुळे मृत्यू झालेले एकूण ६ मृतदेह बेपत्ता झाल्याचा धक्कादायक दावा करत भाजपचे माजी खासदार सोमय्या यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये या सहा रुग्णांची यादी आणि मृतदेह बेपत्ता झालेल्या संबंधित रुग्णालयांची नावं देखील नमूद करण्यात आली होती. मात्र, आता अखेर या प्रकारावर मुंबई महानगर पालिकेकडून खुलासा करण्यात आला आहे. हे मृतदेह बेपत्ता नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.


वाचा सविस्तर – शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता कोरोनाग्रस्ताचा बोरिवली स्थानकावर सापडला मृतदेह!

‘जे ६ मृतदेह गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे, ते मृतदेह गायब झालेले नाहीत. त्या प्रत्येक प्रकरणात प्रशासनाने वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. प्रामुख्याने मृत रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यामुळे किंवा उशिरा संपर्क झाल्यामुळे अशा घटना घडल्या असल्या, तरी प्रशासनाने त्याचं कधीही समर्थन केलेलं नाही. दावा करण्यात आलेल्या ६ मृतदेहांपैकी ५ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात आली आहे किंवा कोविड मार्गदर्शक तत्वांनुसार पोलीस प्रशासनासमवेत त्यावर योग्य ती कार्यवाही देखील करण्यात आली. शेवटच्या राजावाडी रुग्णालयातल्या मृतदेहाबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचाही खुलासा स्वतंत्रपणे करण्यात येईल’, असं पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सकाळी यासंदर्भात एक पत्र लिहून या प्रकारावरून टीका केली होती. तसेच, रुग्णालय प्रशासनावर या प्रकाराबाबत निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. पालिकेला देखील लक्ष्य करण्यात येत होतं. त्यावर आता पालिकेने हा खुलासा केला आहे.

दरम्यान, राजावाडी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या मृतदेहाप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचं मुंबई महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात पालिकेने पत्रक काढलं असून त्यामध्ये येत्या ५ दिवसांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


वाचा सविस्तर – कोरोनाग्रस्ताची हत्या, शवविच्छेदनापूर्वी मृतदेह हॉस्पिटलमधून बेपत्ता!
First Published on: June 9, 2020 5:53 PM
Exit mobile version